नाशिक : येवला रेल्वे स्थानकातील मालधक्क्यावर पक्के बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभर कांद्यासह इतर शेतमाल मालगाडीत चढवणे आणि खते, सिमेंट आदी माल उतरविणे सुलभ होणार आहे.
सध्याचा मालधक्क्यावरील संबंधित भाग (सर्क्युलेटिंग एरिया) साध्या पद्धतीचा असल्याने पावसात चिखल, खड्डे, गाडीचे चाक रुतण, असे अडथळे निर्माण होऊन माल रेल्वे मालगाडीत चढविणे व उतरविणे गैरसोयीचे ठरते. किंबहुना अनेकदा हे काम ठप्प होते. अशा काळात व्यापारी शेतमाल पाठविण्यास, तसेच आलेला माल उतरविण्यास असमर्थ ठरते.
शेतकरी व व्यापारी बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने या मालधक्क्याच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. भुजबळ यांनी रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राव्दारे मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे.
रेल्वे मालवाहतूक सुरक्षित आणि वेगवान करणे यासाठी सर्क्युलेटिंग एरियाचे विशेष महत्त्व असते. कोणताही माल घेऊन आलेली किंवा माल घेऊन जाणारी मालगाडी या भागात उभी राहते. एकाच वेळी मालगाडीच्या सर्व वाघिणी बसतील इतकी या भागाची लांबी असते.. त्यामुळे मालगाडीच्या संपूर्ण लांबीइतका म्हणजेच ७५० मीटर इतकी त्याची लांबी, तर ३० मीटर रुंदी असते. मालगाडीतील माल उतरवून घेण्यासाठी किंवा माल चढविण्यासाठी एका वाघिणीसमोर तीन मालमोटारी, म्हणजेच एकावेळी तब्बल १२६ मालमोटारी उभ्या राहू शकतात.
या सर्व मालमोटारी माल चढवून किंवा उतरवून झाल्यानंतर व्यवस्थित वळवून पुन्हा विनाअडथळा व अल्पावधीत बाहेर पडता येईल, इतका प्रशस्त हा परिसर असतो. या सर्क्युलेटिंग एरियामुळे येवला रॅक पॉइंट कार्यान्वित करणे शक्य होईल. तसेच येवला परिसरातून उत्तर भारतात पाठविला जाणारा कांदा, मका यांसारखा शेतमाल मालगाडीत चढविणे, तसेच खते, सिमेंट आदी माल उतरवून घेणे अगदी पावसाळ्याच्या काळात देखील सहज शक्य होणार आहे. कोणतीही मालगाडी आल्यानंतर त्यात शेतमाल चढविण्यासाठी ठराविक अवधी असतो, त्या अवधीत मालगाडीत माल भरला न गेल्यास रेल्वेकडून विलंब शुल्क (डॅमरेज) आकारण्यात येते. याचा भुर्दंड देखील व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना सहन करावा लागत असे. ते नुकसान देखील टळणार आहे.
या सर्क्युलेटिंग एरियासाठी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील रेल्वे फाटक क्र. ७४ पासून संदर्भित रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच कोटमगाव उड्डाणपुलापासून देखील संदर्भ रस्ता प्रस्तावित असून त्यासाठी देखील भुजबळ यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.
