जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरवरील शेतीला फटका बसला असून, कपाशीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतातील पिकच नाही तर सुपीक मातीही वाहून गेली आहे. पांढरे सोने काळवंडल्याने आता दिवाळी साजरी करावी तरी कशी, असा प्रश्न नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीने ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील केळीसह कपाशी, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. पैकी कपाशी लागवडीखालील शेतीचे सर्वाधिक ४७ हजार हेक्टरहून अधिक नुकसान झाले आहे. रोग व किडींचा विळखा, उत्पादनात घट, मजूर टंचाई आणि कमी भाव, या कारणांमुळे आधीच शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची लागवड कमी केली आहे.

त्यात, बीटी बियाण्यासह रासायनिक खते, किटकनाशके आणि मशागतीवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्यावर शेतातील कपाशीचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे उद्धवस्त झाले आहे. दसरा झाल्यावर कापूस घरात येऊन दोन पैसे मिळतील आणि कुटुंबाची दिवाळी साजरी होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, पीक हाताशी येत नाही तितक्यात अतिवृष्टीसह नदी-नाल्यांच्या पुरामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले.

जळगाव तालुक्यातील बोरनार येथील शेतकरी श्याम देशमुख यांनीही ठिबकवर कपाशीची लागवड केली होती. मात्र, एक लाख रूपये खर्चून अंथरलेली ठिबक आणि शेतातील १०० ते १५० ट्रॉली सुपीक माती तीन दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरामुळे वाहुन गेली. बियाण्यासह रासायनिक खतांचा खर्चही पाण्यात गेला. खतांसाठी तासनतास रांगेत उभा राहिलो होतो. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकच नाही तर मातीही खरडली गेली. त्यामुळे आता जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.

शेती विकून पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा, असा विचार मनात येतो. मात्र, वडिलांनी राखून ठेवलेली शेती विकण्यास मन धजावत नाही, अशी व्यथा शेतकरी देशमुख व्यक्त केली. पुरामुळे शेती खरडून गेल्याने त्या ठिकाणी पुढील काही वर्षे आता कोणतेच पीक घेता येणार नाही. शासनाने मदत दिली तरी त्यातून नुकसान भरून निघणार नाही, असे सुद्धा शेतकरी देशमुख म्हणाले.

कापसाचे १० रूपये सुद्धा येणार नाही

दुसरीकडे, काही ठिकाणी कपाशीचे पीक वाचले असले, तरी परिपक्व कैऱ्या आणि वेचणीवर आलेला कापूस पूर्णतः सडला आहे. कापूस आमच्यासाठी जीवन जगण्याचे प्रमुख साधन आहे. यंदाही कपाशी लागवडीवर हेक्टरी ३० ते ३५ हजार रूपये खर्च केले; परंतु, नैसर्गिक आपत्तीने मोठे नुकसान झाल्यानंतर आता कापसापासून १० रूपये सुद्धा येणार नाहीत, एवढी वाईट परिस्थिती आहे. पांढरे सोने काळवंडल्याने पोट भरावे कसे आणि दिवाळी साजरी करावी कशी, अशी चिंता वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग देशमुख यांनी व्यक्त केली.