जळगाव – जिल्ह्यात भुसावळ-मनमाड रेल्वे मार्गावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत असंख्य गाड्या धावत असल्या, तरी दुपारच्या सुमारास वर्दळ थोडी कमीच असते. परिणामी, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यातील प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. याकडे लक्ष वेधून दुपारी एखादी गाडी सुरू करण्याची मागणी विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय कार्यालयात विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची १७४ वी बैठक आयोजित करण्यात आली. या प्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीणा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल आणि इतर शाखा अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान भुसावळ विभागाने अलीकडे मिळविलेल्या यशाबाबत तसेच प्रवासी सुविधांबाबत माहिती देण्यात आली. समितीच्या सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील रेल्वे गाड्यांच्या समस्या मांडल्या. नवीन गाड्या सुरू करण्याची गरज व्यक्त करून लांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे थांबे वाढविणे, गाड्यांचा विस्तार करणे आणि विभागातील स्थानकांवर प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या.
विभागीय व्यवस्थापक अग्रवाल यांनी भुसावळ विभागात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामासह उपक्रमांची माहिती बैठकीला उपस्थित सदस्यांना दिली. प्रवासी सुविधा वाढविण्यास विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असून येत्या काळात बऱ्याच सुविधा कार्यान्वित झाल्याचे दिसून येईल. समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बैठकीला समितीचे सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी, श्रीकांत सराफ, यशवंत जसूद, राजेश भराडे (भुसावळ), मनीष करवा (अमरावती), अशोक अग्रवाल (मलकापूर), जितेंद्र देशमुख (चाळीसगाव), माधुरी शर्मा (शेगाव), राजनारायण मिश्रा, उन्मेष मालू (अकोला), पंकज नाटानी (बऱ्हाणपूर) आणि संजय सोनवणे (नाशिक) उपस्थित होते.
चाळीसगाव येथील समितीचे सदस्य जितेंद्र देशमुख यांनी भुसावळ-मनमाड मार्गावरील पाचोरा तसेच चाळीसगाव जाण्यासाठी प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी चार या कालावधीत रेल्वे गाडी नसते, या मुद्द्याकडे लक्ष वेधले. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी दुपारच्या सुमारास सोयीची ठरणारी एखादी गाडी सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करण्याची मागणी सुद्धा केली. बैठकीत भुसावळ स्थानकावर न येता परस्पर कॉर्ड लाईनवर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबतही चर्चा झाली. कॉर्ड लाईनवरून परस्पर जाणाऱ्या गाड्या वरणगाव स्थानकावर थांबविल्यास प्रवाशांना तिथे उतरणे सोयीचे ठरेल, असे मत राजेश भराडे यांनी व्यक्त केले.