नाशिक – आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून चरण सेवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिसरात चरण सेवेचा चार हजार २३६ वारकऱ्यांनी लाभ घेतला. यासाठी ६५८ जणांनी स्वयंसेवकांची भूमिका निभावली.
त्र्यंबकेश्वर येथून १० जून रोजी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला होणारा त्रास पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून चरणसेवा उपक्रम हाती घेण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाच्या वतीने १२ ते १६ जून या कालावधीत पालखीतील सहभागी वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली.
नाशिक येथील काजीपुऱ्यातील विठ्ठल मंदिर, पंचवटीतील गणेशवाडी, चेहडी, मौजे पळसे, सिन्नर तालुक्यातील पास्ते, लोणारवाडी, सिन्नर येथील दातली, खंबाळे, निऱ्हळ या ठिकाणी चरणसेवा करण्यात आली. या उपक्रमात आयुर्वेद सेवा संघ संचलित आयुर्वेद महाविद्यालय, श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय, श्री अंजनेय आयुर्वेद महाविद्यालय, एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालय, मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालय, मराठा विद्या प्रसारक भौतिकोपचार महाविद्यालय आदींनी सहभाग घेतला.