धुळे – संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खुद्द गणराय विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्ड्यात उभा राहून पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊन सुरक्षित मार्ग शोधत असल्याचे दृश्य उभे करून महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने गुरुवारी अनोखे आंदोलन केले.
श्री गणपती मूर्ती विसर्जनाचा दिवस येऊन ठेपल्यावरही धुळ्यात विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे आणि त्यात साचलेले पाणी तसेच आहे. प्रशासनाचा हा नाकर्तेपणा दाखविण्यासाठी महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या आंदोलकांनी रस्त्यावर साचलेल्या डबक्यात बैठक मारली. विसर्जन मिरवणूक मार्गावरच्या डबक्यात केवळ गुढघ्यापर्यंत पाणी साचले असल्याचा उपरोधिक टोला समितीचे सदस्य तथा आंदोलक श्रीकृष्ण बेडसे यांनी डबक्यात बस्तान यंत्रणेला हाणला.
शहरातील बहुतेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने गणपती विसर्जन मिरवणूक आणि आरास उभारण्यात आलेल्या वाहनांना कसरत करत मार्गस्थ व्हावे लागणार आहे. गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांना यासाठी प्रचंड त्रास घ्यावा लागणार असूनही संभाव्य अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरी हक्क संघर्ष समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे.
गणपती विसर्जन मिरवणूक निघण्याआधी विसर्जन मार्गवरचे खड्डे बुजवावेत, अशी मागणी काही दिवसांपासून करण्यात येत आहे. तरीही महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कुठलीही ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढे आलेली नाही. यामुळे अखेर महानगर नागरी हक्क संघर्ष समिती रस्त्यावर उतरली.
शहरातील मुख्य बाजारपेठ आणि अन्य वेगवेगळ्या भागातील काही रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.अनेक भागात काँक्रीट रस्ते असले तरी बहुतेक भागातील रस्त्यांची दुर्दशा कायम राहिली आहे. पावसाळ्यात या रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट झाल्याने असे रस्ते चर्चेचा आणि टिकेचा विषय ठरले आहेत. गणपती विसर्जन मिरवणूक ज्या रस्त्याने जाणार आहे, त्या रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. यामुळे विविध मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि शहरातील गणेशभक्त प्रशासनाच्या नाकर्तेपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
गणपती उत्सवाचा आता समारोप होण्याची आणि गणपती विसर्जन करण्याची वेळ आली असतांनाही खड्डे बुजविण्याची व्यवस्था न झाल्याने किमान विसर्जनाच्या एक दिवस आधीतरी खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा समितीतर्फे व्यक्त करण्यात आली. तेही न झाल्याने महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्यावतीने आज रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून करण्यात आलेले आगळेवेगळे आंदोलन लक्ष्यवेधी ठरले. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा निमंत्रक कैलास हजारे, रमेश पोद्दार, संजय बगदे,मिलिंद सोनवणे, डॉ.श्रीकृष्ण बेडसे, पप्पू सहानी, मनोज राघवन,मुकेश गुप्ता, राजेंद्र गुजर, अमित सोनवणे यांच्यासह अन्य आदी समिती सदस्य उपस्थित होते.