जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत धनत्रयोदशी दोन दिवसांवर आली असताना, गुरूवारी देखील दरवाढ कायम राहिल्याने सोन्याने पुन्हा नवीन उच्चांक केला. उच्चांकी दरवाढीमुळे धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांच्या उत्साहावर पाणी पडले. व्यावसायिकांनाही धक्का बसला.

दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधी सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडल्या असून, देशात सोन्याचे दर सातत्याने नवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम एक लाख ३० हजारांपेक्षा अधिक झाले आहेत. जागतिक स्तरावरही सोन्याच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्ड प्रति औंस ४,२४१.७७ डॉलर या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे, तर डिसेंबर डिलिव्हरीसाठी अमेरिकन सोन्याचे वायदे १.२% वाढून ४,२५३.७० प्रति औंस डॉलरवर व्यवहार करत आहेत. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत जवळपास ६० टक्के वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते हा वाढता कल नोव्हेंबरमध्येही कायम राहू शकतो. कारण सणांचा हंगाम जवळ येत आहे आणि खरेदीदार धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहुर्तावरील खरेदीची तयारी करत आहेत.

अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे प्रामुख्याने गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित आश्रयस्थानांकडे वळत आहेत. भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांमधील तणावामुळे देखील सोन्याची मागणी वाढली आहे. अनेक देशांमधील बँका अधिक सोने खरेदी करत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढतच आहेत. जळगाव शहरातही मंगळवारी २२६६ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३० हजार ८१० रूपयांचा उच्चांक केला होता. बुधवारी दिवसभरात आणखी ५१५ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३१ हजार ३२५ रूपयांचा नवीन उच्चांक केला होता. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ४१२ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३१ हजार ७३७ रूपयांचा नवीन उच्चांक केला.

चांदीत मोठे चढ-उतार

शहरात मंगळवारी २०६० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीने एक लाख ८७ हजार ४६० रूपयांचा उच्चांक केला होता. बुधवारी दिवसभरात आणखी ३०९० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीने जीएसटीसह प्रति किलो एक लाख ९० हजार ५५० रूपयांचा नवीन उच्चांक गाठला होता. मात्र, गुरूवारी सकाळी बाजार उघडताच ५१५० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८५ हजार ४०० रूपयांपर्यंत खाली आली.