धुळे : शहरातील एकाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी कारागृहात असणाऱ्या दोन हल्लेखोरांना काही दिवसांपूर्वी न्यायालयाने अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला. परंतु, या दोघांनाही धुळे शहरात प्रवेश करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे.
१८ जुलै २०१७ रोजी सकाळी सव्वासहा वाजता धुळे शहरातील पारोळा रोडवर असलेल्या गोपाल टी हाऊससमोर शेख रफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्ड्या (३३, रा.गरुड कॉलनी, देवपूर, धुळे) यास काही जणांनी गाठले. तलवारी, कोयते आणि गजासह त्याच्यावर हल्ला केला. गोळ्याही घातल्या. या हल्ल्यात गुड्ड्याचा जागीच मृत्यू झाला. आर्थिक कारण आणि गुन्हेगारीत वर्चस्व कायम राखण्याच्या उद्देशाने गुड्ड्याची हत्या झाल्याचा संशय आहे.
याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी १८ संशयितांना अटक करुन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्याखाली नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. यापैकी विजय गोयर ऊर्फ बडा पापा यास १७ जानेवारी २०२५ रोजी आणि विक्रम ऊर्फ विक्की बाबा गोयर यास २३ जून २०२५ रोजी औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला.
दोन्ही हल्लेखोर नाशिक कारागृहातून धुळ्यात आले असता साथीदारांनी जोरदार स्वागत केले. यासंदर्भातील चित्रीकरण आणि छायाचित्रे समाज माध्यमात झळकल्यानंतर दोन्ही गुन्हेगारांना धुळे शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली.
या दोन्ही गुन्हेगारांनी न्यायालयातील खटल्यासाठी निश्चित केलेल्या तारखांशिवाय अन्य दिवशी धुळे शहरात प्रवेश करु नये, शहरात यायचे असेल तर त्यांना धुळे जिल्हा सत्र न्यायाधीशांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विजय गोयर ऊर्फ बडा पापा आणि विक्रम ऊर्फ विक्की गोयर हे शहरात कुठेही कुणाला दिसल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दोघांविरुध्द अनेक गुन्हे
पोलिसांच्या नोंदीत विजय आणि विक्रम गोयर हे दोन्ही सराईत गुन्हेगार आहेत. दोघा संशयितांविरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हत्या, दरोडा, चोरी, घरफोडी, दंगल, मारामारी, जिवे मारण्याचा प्रयत्न, कट रचणे किंवा दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विजयविरुद्ध विविध स्वरूपाचे १२ तर विक्रमविरुद्ध १७ गुन्हे दाखल आहेत.
कोणत्याही गुन्हेगारांचे फलक सार्वजनिक ठिकाणी वा इतर ठिकाणी लावण्यात येऊ नये. असे केल्यास पोलिसांतर्फे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोणीही गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करु नये. – श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)