धुळे – मागील भांडणाची कुरापत काढून वीटभट्टी व्यावसायिकावर साक्री येथे प्राणघातक हल्ला झाला. साक्री येथील बिलाल गॅरेज समोर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत हल्लेखोरांनी बंदुकीतून हवेत गोळ्या झाडल्या. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात मध्यरात्री आठ ते १० जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात संदीप देवरे (३२, रा.आष्टाने,साक्री) या वीटभट्टी व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. मागील भांडणाची कुरापत काढून हल्लेखोरांनी बंदुक आणि लाठ्याकाठ्यांचा वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जुने भांडण मिटविण्याचा बहाणा करून संदीप देवरे यांना मंगळवारी सायंकाळी साक्री शहरातील नवापूर-साक्री रस्त्यावरील विमलबाई महाविद्यालयासमोरील बिलाल गॅरेजजवळ बोलावण्यात आले. याठिकाणी शुभम चव्हाण (रा.आदर्शनगर, ता.साक्री), रवींद्र सुळ (रा.विजापूर,ता.साक्री) आणि संदीप गोवकर (रा.आंबापूर, ता.साक्री) यांच्यासह त्यांच्या अन्य आठ ते १० साथीदारांनी संदीप देवरे यांना आधी शिवीगाळ केली. नंतर लाठ्याकाठ्या आणि हाताबुक्यांनी मारहण केली. यावेळी शुभम चव्हाणने खिशातून बंदुकीसारखी वस्तु काढली. आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने देवरे यांच्यावर रोखली. यावेळी संदीप देवरे यांचा मित्र हर्षल देवरे याने शुभम चव्हाणचा हात वर केला. यामुळे आकाशात गोळ्या झाडल्या गेल्या.
दरम्यान, संदीप गोयकर याने संदीप देवरे याच्या डोक्यात कठीने वार केला. तो देवरे यांनी चुकविला. परंतु, त्यांच्या डाव्या खांद्यावर वार झाला. आणि ते जखमी झाले. या तक्रारीवरुन साक्री पोलीस ठाण्यात शुभम चव्हाण, संदीप गोवकर या दोघांसह आठ ते १० हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक वळवी यांनी प्राणघातक हल्ला प्रकरणात काही हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य काहींचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले.
दरम्यान, साक्री शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. साक्री हे धुळे किंवा इतर शहरांसारखे मोठे शहर नसतानाही पोलिसांना गुन्हेगारीवर अटकाव करता येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. किरकोळ कारणावरुन गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांसमोरही आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी राजकीय दबावाची पर्वा न करता गुन्हेगारी मोडून काढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.