धुळे : शहरात अनेक वर्षांपासून पाणी पुरवठ्यात कोणताच बदल झालेला नसून अनेक भागात अनियमित पाणी पुरवठा केला जात असताना पाणीपट्टी मात्र नियमितपणे वसूल केली जात आहे. हा अन्याय यापुढे सहन करणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेवी आयुक्तांच्या दालनासमोर अंघोळ करून महापालिकेच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला. यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मनसेने भूमिका मांडली आहे. शहराच्या विविध भागात १० ते १२ दिवस उलटूनही पिण्याचे पाणी मिळत नाही, महिलांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका निवडणुकीवेळी मंत्री गिरीश महाजन यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची पूर्तता न होता उलट महापालिका मात्र रहिवाशांकडून वर्षभराचा पाणी कर वसूल करत आहे. पाण्याची समस्या मांडण्यासाठी भ्रमणध्वनी केल्यावर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून री उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वीज नसल्याचे कारण देत टाळाटाळ करतात. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी धुळेकरांना विकासाची मोठी स्वप्ने दाखवली. परंतु, हक्काचं पाणी देऊ शकले नाही. मनपाने लवकरात लवकर समस्या दूर न केल्यास नागरिकांना घेऊन आयुक्तांच्या दालनासमोर येऊ आणि दररोज अंघोळ करू.असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गौरव गिते, हर्षल परदेशी, शामक दादाभाई, भावेश गद्रे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule municipal commissioner hall in protest against irregular water supply ysh
First published on: 25-04-2023 at 14:10 IST