धुळे : राज्यात लवकरच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष मोहिम हाती घेतली आहे.

निवडणुका जवळ आल्या की काही गटांकडून अंगरक्षक, बाउन्सर आणि आखाड्यांतील बलदंड व्यक्तींचा वापर करून समाजात दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्व १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जिम, व्यायामशाळा, आखाडे तसेच अंगरक्षक आणि बाउन्सर व्यवसाय करणाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून सूचना देण्यात आल्या.

समाजात दहशत निर्माण होईल अशा कोणत्याही कृत्यात सहभागी होऊ नये, गुंड, समाजकंटक किंवा गुन्हेगारांच्या संपर्कात राहून शक्ती प्रदर्शन करू नये, तसेच कोणतेही अयोग्य वक्तव्य किंवा कृती करून जनतेवर दबाव आणू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. कोणत्याही प्रकारे अवैध बॅनर, पोस्टर लावून समाजावर दबाव निर्माण करणे, किंवा प्रचारादरम्यान भीतीचे वातावरण निर्माण होईल असे प्रकार करू नयेत, याची विशेष सूचना यावेळी देण्यात आली आहे. या सर्वांना भारतीय न्याय संहिता कलम १७८ नुसार नोटिसा देण्यात आल्या असून, नियमभंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मागील निवडणुकांच्या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मारहाण, धमक्या, बेकायदेशीर जमावबांधणी आणि प्रचारादरम्यान वादविवादाची प्रकरणे घडल्याने यावेळी पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

पोलिसांनी यापूर्वीही एकदा सराईत गुन्हेगार आणि झोपडपट्टी दादांना पोलिस ठाण्यात बोलावून सक्त ताकीद दिली होती. यामुळे संभाव्य गुन्हेगारीवर काहीसे नियंत्रण येऊ शकले होते. आताही असाच काहीसा प्रयत्न झाल्याने साहजिकच पोलिसांच्या भूमिकेबद्दल धुळेकरांनी समाधान व्यक्त केले आहे.शहर आणि जिल्ह्यात संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भाग आहे. अशा ठिकाणी सातत्याने होणारी कुरबुर, अप्रिय घटना किंवा मोठे गुन्हे त्या त्या भागातले रहिवासी आणि खुद्द पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरल्याची उदाहरणे आहेत. निवडणुकीच्या अनुषंगानेतर असे प्रकार अनेकदा घडले आहेत. यामुळे खास निवडणूकपूर्व पोलिसांना असा दांडपट्टा दाखविणे गरजेचे ठरले आहे.

काल दिवसभरात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतले बाऊन्सर, बॉडीबिल्डर किंवा व्यायामशा आणि आखाड्यांशी संबंधित असलेले व्यक्ती पोलिस अधिकाऱ्यांसमोर हजर झाले आणि त्यांनी पोलिसांच्या सूचना वजा आदेश ऐकले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस ठाण्यांना सतत गस्त वाढविण्याच्या आणि संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील संवेदनशील भागांची यादी तयार करून त्या ठिकाणी रात्री गस्त वाढविण्यात आली आहे.

पोलिसांच्या या उपक्रमामुळे येणाऱ्या निवडणुकांदरम्यान शांतता, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.