धुळे : विदेशातून येथे आलेल्या एका व्यक्तीला मंकी पॉक्स (एमपाॅक्स) हा संसर्गजन्य आजार झाला आहे. या आजाराचा हा राज्यातील पहिला रुग्ण असून संबंधिताचे दोन्ही अहवाल सकारात्मक आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णाला शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांनी दिली.
शहरातील ४४ वर्षांची ही व्यक्ती दोन ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून आली होती. चार वर्षांपासून संबंधित सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला.शहरात आल्यावर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तीन ऑक्टोबर रोजी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात तो दाखल झाला. त्याला संसर्गजन्य आजार असल्याचे लक्षात येताच त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
दोन वेळा त्याचे रक्ताचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. दोन्ही अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे राज्यातील हा मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण असल्याचे राष्ट्रीय विज्ञान संस्थेने हिरे शासकीय रुग्णालयाला कळविले आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. सदर रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी महापालिकेकडून करण्यात आली. रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.
मंकीपाॅक्स हा विषाणूजन्य आजार आहे. यामध्ये ताप आल्यावर अंगावर पुरळ उठू लागतात. लिम्फ नोड्स (लसिका ग्रंथी) सुजतात. शरीरावर फोड येतात, जे नंतर खाजरे होतात. खाजवल्यावर त्यांची खपली पडते. हा आजार सामान्यतः दोन ते चार आठवडे टिकतो. लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात. डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थकवा अशी लक्षणे आढळतात. लक्षणे दिसण्यासाठी पाच ते २१ दिवसांचा कालावधी लागू शकतो. हा आजार होऊ नये, यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे, चांगला आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अंगावरील खाज कमी करण्यासाठी थंड किंवा कोमट पाण्याने स्नान करणे उपयुक्त ठरू शकते. संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असते. काही वर्षांपूर्वी आफ्रिकेतील सुमारे १३ देशांमध्ये हा आजार पसरला होता. ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती.