धुळे – जबरी चोरी आणि लुटमार केल्याचे आरोप असलेल्या शिकलकर (भादा) टोळीतील तिघांना धुळे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. चॅम्पियनसिंग भादा (२४) असे तडीपार झालेल्या टोळी प्रमुखाचे नाव असून बरसात कौर भादा (४२) आणि फतेसिंग भादा (२०) अशी टोळी सदस्यांची नावे आहेत. हे सर्व धुळ्यातील मोहाडी उपनगरात वनश्री काॅलनीतील दिडशे खोली भागात वास्तव्यास आहेत. या संशयितांनी धुळे जिल्ह्यातील मोहाडीनगर, धुळे तालुका, चाळीसगावरोड पोलीस ठाणे, वडनेर

खाकुर्डी (जि.नाशिक), बार्शी (जि. सोलापूर) आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २०१९ पासून विविध स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. हत्या, घातक हत्यारांनी दुखापत करणे, दंगा, चोरी करणे यांसह बेकायदेशीरपणे एकत्र येऊन जमाव जमविणे, दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे,पुरावा नष्ट करणे, कट रचणे, घातक शस्त्र बाळगणे, घरफोडी, विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेवर हल्ला करणे, धार्मिक भावना दुखावणे, जातीवाचक शिवीगाळ करणे यासारखे गंभीर गुन्हे शिकलकर (भादा) टोळीवर दाखल आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या गुन्हेगारी टोळीमुळे धुळे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या जिवितास, मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यांच्या संभाव्य गुन्हेगारी कृत्यातून कायदा व सुव्यवस्था बाधा पोहचण्याचा धोका निर्माण झाल्याने मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे या संशयितांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये धुळे जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची धुळे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी चौकशी केली. त्यानंतर तडीपारी करण्याची शिफारस करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे हद्दपार प्रकरणी सुनावणी झाल्यावर तिघांना एक वर्ष कालावधीसाठी संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीतुन तिघांना तडीपार करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, चेतन मुंडे,संतोष हिरे, हर्षल चौधरी,कबीर शेख व रमेश शिंदे यांनी केली. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.

शिकलकर (भादा) टोळीच्या प्रमुखांसह दोन्ही सदस्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अथवा महाराष्ट्र शासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय प्रतिबंधित क्षेत्राच्या हद्दीत प्रवेश केल्यास किंवा तसे ते आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध दोन वर्ष शिक्षा किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकेल. – श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक,धुळे).