धुळे – महानगरपालिकेच्या ठेकेदाराने दोन महिन्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिलेले नाहीत. दिवाळी सण तोंडावर आल्याने स्वच्छता कर्मचारी हवालदिल होऊन त्यांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे धुळे शहरात व्यापारी पेठेसह कॉलनी परिसर आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर उभे राहिले आहेत. दोन दिवसात याविषयी कार्यवाही न झाल्यास सर्व कचरा उचलून आयुक्तांच्या दालनात टाकण्याचा इशारा शिवसेनेतर्फे (उध्दव ठाकरे) महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.
महानगरपालिकेने कचरा संकलनाचे काम ठेकेदाराला दिले असताना सहा दिवसांपासून कुठल्याही भागात कचरा संकलन झालेले नाही. या अनुषंगाने सबंधित ठेकेदाराकडून दंड वसूल करून त्यास साथीचे आजार आणि असुविधांबाबत जबाबदार ठरवावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली आहे. धुळ्यातील जवळपास सर्वच भागातील कचरा उचलला न गेल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे अनेक वसाहतींमध्ये साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धुळे महानगरपालिका आयुक्तांनी केवळ बांधकाम ठेकेदारांची अडकलेली देयके देण्याचा सपाटा लावला असून, शहराच्या मूलभूत सेवा सुविधा या बाबींकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. कचऱ्याच्या ठेकेदाराचे दोन महिन्यांचे थकीत देयके देण्यासाठीही महानगरपालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी ऐन सणासुदीच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या खिशात हक्काचा पगार नसल्यावर ते काम तरी कसे करणार, असा प्रश्न यानिमित्त केला जात आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. स्वच्छता कामगारांच्या पगारामध्ये स्वच्छता ठेकेदाराने वाढ करावी, त्यांना वेळेवर पगार द्यावा, अशी मागणी केली आहे.
सहा दिवसापासून धुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून धुळे महानगरपालिकेच्या कुठल्याही प्रश्नात आमदारांना वारंवार मध्यस्थी करावी लागत असून आयुक्त मात्र ढिम्म आहेत. , त्यामुळे आता धुळे शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी ही विद्यमान आमदारांवर टाकावी का, असा प्रश्न ठाकरे गटाने महानगरपालिका आयुक्तांना केला आहे.यावेळी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, संदीप सूर्यवंशी, सुनील पाटील, निबा मराठे आदींसह उपमहानगर प्रमुख व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.