जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती व्हावी म्हणून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते एकीकडे भाजपला गळ घालत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाची भाषा करून भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपनेही आता त्यांना आव्हान देणाऱ्या शिंदे गटाच्या गळ्याभोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. पाचोऱ्यात दिवाळीच्या धामधुमीत मोठ्या घडामोडींना वेग देखील आला आहे.
लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून एकत्र लढलेल्या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये इतके दिवस चांगला संवाद होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून भाजपसह शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील बेबनाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना जिंकून आणण्याची वेळ आल्यावर विशेषतः भाजप मैत्रीपूर्ण लढतींची भाषा करत आहे. त्यामुळे पायाखालची जमीन सरकलेल्या शिंदे गटात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होते, तशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही ? असा प्रश्न शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशीही भीती त्यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे.
असे असताना, शिंदे गटाचे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाची भाषा करून बंडाचे निशाण फडकावल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील युतीसाठी प्रयत्न करत असताना, त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पाटील यांनी हालाचाली गतीमान केल्या आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली पाहिजे, हे नेत्यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिंदे गट कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक सवबळावर लढणार असल्याची थेट घोषणा आमदार पाटील यांनी केली आहे. माझ्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढणाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजप युतीची भाषा करत असेल तर त्यांच्या विश्वास ठेवावा तरी कसा, असाही सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आमदार किशोर पाटील हे विनंती करूनही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही म्हटल्यावर भाजपने सुद्धा सावध पवित्रा घेऊन त्यांना घेरण्याची रणनिती आखण्यासाठी पाऊले उचलली आहेत. पाचोरा शहरात भाजपचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करून त्याचे दणक्यात उद्घाटनही मंत्री गिरीश महाजन यांनी पाडव्याच्या दिवशी केले.
विशेष म्हणजे आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सुर्यवंशी यांनी भाजप कार्यालय सुरू करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले. अर्थात, भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे हे सर्व उपस्थित होते. पैकी माजी आमदार वाघ यांनी आमदार पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री महाजन यांनीही तुम्ही युती करण्यास तयार नाही तर आम्ही काय तुमच्या मागे फिरायचे का, असे वक्तव्य केले.
