नाशिक – लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश महिला वर्ग भाऊबिजेसाठी माहेरी जाण्यासाठी उत्सुक असतात. यंदाही गुरूवारी भाऊबिजेसाठी बाहेर गावी जाण्याकरिता जिल्हा परिसरातील बहुतांश बस स्थानके गर्दीने हाऊसफुल्ल राहिली. लांबपल्याच्या गाड्यांसह जिल्हातील गाड्यांना गर्दी होती. बच्चे कंपनीही मामाच्या गावाला जायला मिळणार म्हणून खुष होते.
दीपोत्सवाची सांगता ही भाऊबिजेने होत असते. दिवाळीच्या कामात व्यस्त असलेल्या महिलांना हक्काचा विसावा भाऊबिजेनिमित्त मिळत असतो. वर्षातून एकदा मामाच्या गावाला जाण्याची संधी मिळते. या मुळे दिवाळीच्या सुट्टीसाठी जिल्हा परिसरातील बहुतांश बसस्थानकांमध्ये महिला तसेच बच्चे कंपनीची गर्दी अधिक राहिली. गुरूवारी भाऊबिजेसाठी जाण्याकरिता मुंबई, पुणे पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार सह अन्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवाश्यांनी गर्दी केली होती.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनेही प्रवाश्यांची वाढती संख्या पाहता जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. गुरूवारी सकाळपासून बस स्थानकांमध्ये गर्दी होण्यास सुरूवात झाली. बुधवारच्या तुलनेत ही गर्दी कमी असल्याचे विभाग नियंत्रक किरण भोसले यांनी सांगितले. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, सटाणा, मालेगाव साठी गर्दी सर्वाधिक राहिली. तुलनेत पुण्याची गर्दी होती. याशिवाय शिर्डी तसेच सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी भाविकांची गर्दी कायम राहिली.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसचे नियोजन असले तरी प्रवाश्यांची संख्या पाहता गर्दी आणि उपलब्ध बसची संख्या कमी पडत असल्याने प्रवाश्यांचा खोळंबा झाला. यासाठी प्रवाश्यांनी जागा मिळवण्यासाठी मिळेल तो मार्ग स्विकारला. काहींनी खिडकीतून प्रवेश मिळवला तर काहींनी इतर प्रवाश्यांशी झटापट करत जागा मिळवली. प्रवाश्यांच्या जागेसाठी वादावादी गाडी सुरू होई पर्यंत सुरू राहिली. दुसरीकडे, काहींनी आपली दुचाकी, चारचाकी काढत जवळील पर्यटन स्थळांना भेट देणे पसंत केले.
त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची वाढलेली गर्दी पाहता जव्हार फाटा नजीक असलेल्या बसस्थाक परिसरात खाजगी वाहने थांबवण्यात आली होती. या ठिकाणी पैसे देत वाहन लावण्याची व्यवस्था करण्यात आली. त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागले. पर्यटकांनी त्र्यंबक नजीक असलेले धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळे एका दिवसात फिरता यावी या अनुषंगाने नियोजन ठेवले.
मात्र या पर्यटनात नाशिक महानगर प्राधिकरणच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईचे सावट कायम राहिले. भाऊ बीजेची सुट्टी असल्याने त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड यासह शहरातील सोमेश्वर, दत्तधाम, प्रती शेगाव आदी धार्मिक प्रार्थनास्थळांसह शहरातील अडव्हेंचर पार्क, नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसर, मिसळ पॉईट हे नागरीकांच्या गर्दीने हाऊसफु्ल राहिले.
