नाशिक – प्रकाशाचा उत्सव दिवाळी सण अवघ्या काही तासांवर आला असतांना महिलावर्ग सध्या फराळाच्या तयारीत मग्न आहे. दिवाळीनिमित्त करण्यात येणाऱ्या साफसफाईत दमलेल्या महिलांसमोर फराळ करण्याचे आव्हान आहे. अनेक जणी तयार फराळ आणतात. किंवा मजुरी देत फराळ बनवून घेतला जात आहे. शहरात एखाद्या गल्लीतील रिकामी जागा, चौकांमध्ये आचारी सध्या मजुरी घेऊन फराळ बनवून देण्याच्या कामात व्यस्त आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत दरवाढ असली तरी मागणीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
दिवाळी म्हणजे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याची एक पर्वणी. चिवडा, अनारसे, चकली, शेव, लाडु, करंजी, शंकरपाळे या पारंपरिक फराळाच्या यादीत आला पाकातील चिरोटे, बुंदीचे लाडू, बाकरवडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्टिक्स याशिवाय शेवचे असंख्य प्रकार समाविष्ट झाले आहेत. फराळ म्हणजे सुगरणींसाठी आपले पाककौशल्य दाखविण्याची संधी. मात्र गडबडीत फराळ तयार करतांना एखादा जिन्नस कमी जास्त झाला तर फराळ बिघडतो.
ही वेळ येऊ नये यासाठी सध्या समाजमाध्यमांत वेगवेगळ्या किचन ग्रुपकडून दाखविण्यात येणाऱ्या पाककृतीनुसार फराळाचे पदार्थ तयार केले जात आहेत. कारण बऱ्याचदा यामध्ये समोरची व्यक्ती एखादा पदार्थ फिस्कटला तर काय करावे, याची सूचना सातत्याने करत असल्याने महिलावर्ग यानुसार फराळ तयार करण्याला पसंती देत आहे. मात्र दिवाळीच्या साफसफाईच्या कामात दमलेल्या महिलांकडून एखाद्या आचाऱ्याकडे जावून तर काहींकडून आचारी घरी बोलावत किंवा तयार फराळाला पसंती दिली जात आहे.
सध्या बाजारपेठेत घरगुती तयार फराळ तेही वेगवेगळ्या संचात उपलब्ध आहेत. आचाऱ्याकडून फराळ तयार करून घेतांना साधारणत: २०० रुपयांपासून पुढे पदार्थाची विक्री होत आहे. याविषयी अहिरराव बंधू यांनी माहिती दिली. पारंपरिक पदार्थांसह मिक्स फरसाण, लसुन फरसाण, खारीबुंदी, गोडबुंदी, मोहनथाळ आदी पदार्थ देण्यात येत आहेत.
यामध्ये साधारणत: २५० रुपये किलोपासून ६००-७०० रुपये किलो दराने पदार्थानुसार विक्री होत आहे. काही सामाजिक संस्थाकडून ना नफा ना तोटा या तत्वावर तयार फराळाची विक्री होत आहे. याविषयी निर्जला देशपांडे यांनी माहिती दिली. फराळ करणे म्हणजे दमछाक. चकलीची भाजणी तयार आणली. बाजारात शेव प्रतिकिलो १०० रुपये दराने करुन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.