डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्काराने नाशिक येथील डॉ. विकास गोगटे यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आजवरच्या वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालीचा सुहास जोशी यांनी या अनावृत्त पत्राद्वारे घेतलेला वेध..
प्रिय डॉ. विकास,
सप्रेम नमस्कार, तुम्हाला डॉ. वसंत पवार स्मृती प्रित्यर्थ मिळालेल्या पुरस्काराच्या बातमीने आनंद झाला. तुमचे मनपुर्वक अभिनंदन.. सुयोग्य व्यक्ती निवडल्याबद्दल नीलवसंत मेडिकल फाऊंडेशनचे अभिनंदन.
काही माणसं अशी असतात की, जी दुसऱ्यांच्या मनात घर करून राहतात. आपला ठसा उमटवतात. मग तो व्यक्तिमत्वाचा असो वा स्वभावाचा अथवा व्यावसायिकतेचा. माझ्या मनात तुमचा एक ठसा डॉक्टर म्हणून तर आहेच, पण आदर्श माणूस म्हणून तुम्ही त्याला खुप मोठी जोड दिली आहे. आपली खरी ओळख, मी जेव्हा रोहिणी बापटची सुहास जोशी झाले तेव्हापासूनची. त्या आधी ती. अण्णांपासून सगळ्यांना ओळखत होतोच. नंतर प्रत्यक्ष ओळख झाली. ती वाढत असताना तुमच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलु उमजत गेले. तुमचे प्रसन्न व्यक्तिमत्व आणि टापटीप राहणी, तुमचा समोरच्याशी होणारा संवाद, सखोल विचारपूस, आश्वासक शब्द, जाता जाता विनोद सांगून समोरच्याला आश्वस्त करणारे तुमचे व्यक्तीमत्व समोरच्याला प्रभावित करते. या स्वभाव वैशिष्ठय़ामुळे तुमचा जनसंपर्क दांडगा झाला. या जनसंपर्कात आजवर कधीच तुमच्याबद्दल कोणाकडून कटुता अनुभवली नाही.
व्यक्ती म्हणून तुमचा परिचय करून घेतांना तुम्ही व्यायामाला दिलेले महत्व त्यासाठी घेत असलेली मेहनत सर्वश्रृत आहे. पण ‘नो पेन, नो गेन’ हे तुमचे वाक्य तुमच्या कार्यशैलीची प्रचिती देते. रुग्णांशी संवाद साधतांना त्यांच्या आजाराची माहिती घेत केसपेपर्स तयार करणे. रुग्णसेवेत सगळ्या साधनांचा वापर होत असतांना दूरध्वनी, भ्रमणध्वनी आणि आता व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून तुम्ही रुग्णांच्या सतत संपर्कात राहतात. बाहेरगावी जरी काही त्रास झाला तर तुमच्याशी चर्चा करत ‘ठिक’ असा शेरा मिळाला की रुग्णही विश्वासाने पुढील कामास लागतात. रुग्णांना वैद्यकीयदृष्टय़ा सजग करण्यासाठी तुम्ही ‘डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी’ ही लेखमाला लक्षवेधी ठरली. त्याचे पुस्तक तयार झाले. त्यातील प्रत्येक पानावर शेवटी दोन ओळींची विनोदी झालर. ती कल्पना छान वाटली. बाहेरगावी किंवा परदेशात जातांना काही त्रास झाला तर कुठली औषधे घ्यायची यासाठी ‘औषध संच’ ही तुमची संकल्पना उल्लेखनीय आहे. साध्या साध्या गोष्टींसाठी लागणारी माहिती, त्यावर औषधे कशी घ्यावी हे सगळे त्यात आले. कामाच्या गरबडीतही तुम्ही वाचन, संगीत, भाषेची आवड, पर्यटन हे छंद जोपासले. वाचनाचा निर्मळ आनंद दुसऱ्यांपर्यंत पोहचावा यासाठी तुम्ही कायम आग्रही राहिला. व्यक्ती लहान आहे की मोठी, यापेक्षा त्या व्यक्तीबद्दल आदर, आपुलकी, चौकशी करणे हा तुमचा गुण घेण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमची पत्नी विनीता नव्या पिढीशी सहज जुळवून घेतात. त्यांच्यावर काही लादण्यापेक्षा, आरोप करण्यापेक्षा किंवा एखादा शिक्का मारण्यापेक्षा त्यांना काय वाटतं, ते काय करू शकतात, हा आशावाद तुम्ही त्यांच्या मनात रुजवता.
अण्णांच्या पश्चात त्यांच्या स्मृती चिरकाल रहाव्यात यासाठी तुम्ही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यान ठेवले. वि. म. गोगटे पुरस्कार सुरू केला, ही तुमची उपक्रमशीलता सामाजिक बांधिलकी प्रतीत करते. आज तुम्हाला मिळालेला हा पुरस्कार हे त्याचेच द्योतक आहे. सामाजिक बांधिलकी, लोकशिक्षण, संस्कारक्षमता, सदाचरण, उपक्रमशीलतेचा संगम तुमच्या व्यक्तीमत्वात आहे. तुमच्या कामाला यशपाल आणि केतकी यांची साथ आहे. ती तशीच राहो ही सदिच्छा.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2015 रोजी प्रकाशित
केवळ डॉक्टर नव्हे, तर आदर्श व्यक्ती
डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्काराने नाशिक येथील डॉ. विकास गोगटे यांना सन्मानित करण्यात आले.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 09-10-2015 at 06:35 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vikas gogate awarded by dr vasantrao pawar smriti award