जळगाव: जिल्ह्यातील अमळनेरचे आमदार अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पहिल्या फळीतील नेते मानले जात असले, तरी त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नव्हती. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या वाट्याला पुन्हा मंत्रिपद येण्याची शक्यता व्यक्त होत असताना, प्रत्यक्षात छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अनिल पाटील यांची संधी हुकली आहे.
जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे चित्र लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये गिरीश महाजन यांच्यासह संजय सावकारे, गुलाबराव पाटील, जयकुमार रावल या चार मंत्र्यांचा समावेश झाला आहे. याशिवाय रावेरच्या खासदार रक्षा खडसे या केंद्रातील भाजप सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री आहेत. उल्लेखनीय म्हणजे पाचही मंत्री ओबीसी व इतर प्रवर्गाचे असून, एकही मंत्री मराठा नसल्याने मोठा सामाजिक असमतोल खान्देशात निर्माण झाला.
गेल्या वेळी राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात अमळनेरमधील अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला स्थान मिळाले होते. परंतु, यावेळी वाट्याला आलेल्या मर्यादित जागांचा विचार करता अजित पवार गटाला इच्छा असूनही अनिल पाटील यांना मंत्रिपद देता आले नाही. खान्देशपासून विदर्भापर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार गटाचा एकमेव मंत्री आहे, त्यातही मराठा समाजाला संधी मिळालेली नाही. राजकीय व सामाजिक समतोल साधण्यासाठी अमळनेरचे आमदार पाटील यांचा मंत्रिपदासाठी त्यामुळे विचार होऊ शकतो, असे इतक्या दिवसांपासून बोलले जात होते. मंत्री नरहरी झिरवळ यांनीही काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरात तसे संकेत दिले होते.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव आणल्यानंतर अजित पवार गटाला मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला. वजा झालेल्या मंत्र्यांच्या जागी अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता त्यामुळे वाढली होती. अजित पवार यांना पक्षफुटीच्या वेळी साथ देणारे अनिल पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे मंत्री मुंडे यांच्यानंतर पाटील हे अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांना यावेळीही मंत्रिपदाने हुलकावणी दिली.