जळगाव – शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरूणाची दोघांनी तलवार आणि धारदार कोयत्याने हत्या केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी गुन्ह्यातील मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या तासांत जेरबंद केले असून, त्यास औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ज्ञानेश्वर उर्फ नाना भिकन पाटील (२७), असे मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर याचा त्याच्या घरासमोर सुरू असलेल्या कामावरील काही तरुणांशी जुना वाद होता. त्याच वादातून शुक्रवारी रात्री तो एकता मित्र मंडळाजवळ उभा असताना दोन तरूणांनी अचानक त्याच्यावर तलवार आणि कोयत्याने सपासप वार केले.

हल्लेखोरांनी पोटावर तसेच पायाच्या मांडीवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. आजुबाजुच्या नातेवाईकांनी व मित्रांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासणीनंतर मृत घोषित केले.

तरूणावरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाला गती देऊन हल्लेखोरांना जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गायकवाड यांनी पोलीस कर्मचारी नितीन बाविस्कर, किशोर पाटील, छगन तायडे, रवींद्र कापडणे यांचे पथक तयार करून दोन्ही हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नशिराबाद येथून हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (२७, रा. कासमवाडी) यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तसेच दाखल गुन्ह्याच्या पुढील कारवाई कामी त्यास औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून कासमवाडी परिसर सातत्याने चर्चेत आहे.

वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. परंतु, इतक्या गंभीर घटनांनंतरही संबंधितांवर पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे किरकोळ कारणांवरून थेट हत्येचे पाऊल तरूण उचलताना दिसून येत आहेत.