धुळे: चिवटीबारी (ता. साक्री) येथील गायका डोंगरावरून २५० फूट उंचीवरून कोसळणारा रमणीय धबधबा नाशिक आणि धुळे जिल्ह्यांच्या सिमेवर आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात येथे पर्यटक आणि निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणावर भेट देत आहेत. यंदा सुटी संपल्यावरही या परिसरातील पर्यटन सहली सुरूच आहेत. येथील धबधब्याचे स्थान आणि नैसर्गिक सौंदर्य मोठे आकर्षक आहे.

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगरदऱ्यांतून वाहणारे ओहळ झरे लहानमोठे धबधबे तसेच वन्यपक्षी, वनस्पती, औषधी झाडांनी वेढलेले परिसर पर्यटकांना निसर्गाची खरी ओळख करून देतो. हिरव्या झाडांनी नटलेला हा परिसर जणू निसर्गाने रंगवलेला नंदनवन आहे. यामुळे केवळ जिल्ह्यातून नाही तर थेट गुजरात आणि जिल्ह्याच्या आजुबाजूच्या जिल्ह्यातून एक दिवसीय सहलीसाठी उत्तम ठिकाण म्हणून या ठिकाणी रोज विविध भागातून शेकडो पर्यटक येतात. या स्थळापासून जवळच्या पर्यटनस्थळांमध्ये पिंपळनेर येथील लाटीपाडा धरण, आमळी येथील अलालदरी, चिवटीबारीचा धबधबा, निसर्गरम्य बारिपाडा, त्रिगंगा उगमस्थान पांझरा नदी, श्रीक्षेत्र शेंदवड भवानी मंदिर तसेच गुजरात सीमेजवळील शबरीधाम यांचा समावेश आहे.

या परिसरात वन्यजीव आणि जैवविविधता दिसते.गायका डोंगर परिसरात विविध प्रकारचे वन्यपक्षी वन्यजीव औषधी वनस्पती आणि दुर्मिळ झाडे आढळतात. स्थानिक ग्रामस्थांच्या मते येथे काही दुर्मिळ औषधी वनस्पतींचा शोध लागला असून या भागात जैवविविधतेचा समृद्ध साठा आहे. या परिसरात पर्यटकांना नैसर्गिक अभ्यासाचा अनुभव घेता येतो.यासाठीही अनेकजण या ठिकाणी भेट देऊ लागले आहेत.

अलीकडेच येथे पर्यटकांसाठी झोपड्या कमानी आणि त्यावरती विश्रांती स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी ग्रामस्थांनी वनसंरक्षण समिती स्थापन केली व पर्यटन सुविधा आणि स्थानिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.पर्यटनासाठी येणाऱ्या लहान मोठ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभाग,पोलिस आणि महसूल विभागांनी विशेष दक्षता घेतली आहे.यामुळे विशेषतः पावसाळा आणि थंडीच्या दिवसात या पर्यटन केंद्राला भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय ठरू लागली आहे.

नवापूर रोड लगतचे नैसर्गिक दृश्य हे छायाचित्रकारांसाठी विशेष आकर्षण आहे. तालुक्यातील काही भागांमध्ये हरण, ससा, मोर आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. हे ‘इको-टुरिझम’साठी योग्य ठिकाण आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी समाजाचे पारंपरिक सण, लोककला, नृत्य आणि जीवनपद्धती पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देतात. या भागात अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करतात. पर्यटकांना शेतीचा अनुभव घेता येतो आणि ग्रामीण जीवनाशी जवळीक साधता येते. वर्षभर सुखद हवामान, पावसाळ्यात धुक्याने नटलेले टेकाडे, आणि हिवाळ्यात थंड वाऱ्यांनी भारलेले वातावरण हे सर्व पर्यटकांना विश्रांती आणि शांतता देतात.

साक्री हे धुळे जिल्ह्याशी उत्तम जोडलेले असून, धुळे शहरातून रस्तामार्गे सहज पोहोचता येते. काही ठिकाणी स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
चिवटीबारीला धुळे कडून साक्री, पिंपळनेर, कुडाशी, डांगशिरवाडे, बोपखेल आणि विजयपूरमार्गे जाता येते. धबधबा रस्त्यावरून दिसतो तर गणपती मंदिर जंगलातील वाटेने गाठावे लागते. सटाण्या कडून ताहराबाद, अंतापूर, मुल्हेर हरणबारी, बोहाटा अशा मार्गे देखील चिवटीबारी गाठता येते.

नैसर्गिक पर्यटन हरित वातावरण शांत डोंगर आणि शुद्ध हवा यांचा अनुभव घेण्यासाठी चिवटीबारी हे ठिकाण आदर्श आहे. निसर्गप्रेमी फोटोशूट करणारे तसेच थोडा साहसी अनुभव घेण्याचे इच्छुक पर्यटक येथे नक्की भेट देतात.