जळगाव – जिल्हा सहकारी बँकेने शंभर वर्षांहून जुनी दगडी बँक शाखेची इमारत विक्रीला काढल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र, विरोधानंतरही मागे हटण्यास तयार नसलेल्या जिल्हा बँक अध्यक्षांनी दोन्ही नेत्यांना थेट आव्हान देण्याची भूमिका घेतल्याने आता दगडी बँकेचा वाद आणखी जास्त पेटला आहे.
शेतकऱ्यांच्या घामातून उभी राहिलेली जिल्हा सहकारी बँकेची नवी पेठेतील ऐतिहासिक शाखा ‘दगडी बँक’ म्हणून ओळखली जाते. मात्र, शतकोत्तर परंपरा लाभलेली ही वास्तू विकण्याचा घाट विद्यमान संचालक मंडळाने घातल्याने आता ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी सर्वात आधी जिल्हा बँकेच्या निर्णयास तीव्र विरोध केला. परंपरेचे, वारशाचे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल पुरातन इमारतीच्या विक्रीतून कधीच होऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या दगडी बँकेची ऐतिहासिक वास्तू विकण्यामागे संचालक मंडळाचा नक्की उद्देश काय आहे ? असा प्रश्न उपस्थित करून आमदार खडसे यांनी दगडी बँकेची किंमत ६५ कोटी असू शकते, असाही दावा केला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे हे विरोधी पक्षाचे नेते असले तरी त्यांनी दगडी बँक इमारतीच्या विक्रीला केलेल्या विरोधाला सत्ताधारी शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही अप्रत्यक्ष पाठींबा दर्शविला आहे. जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुमारे ६५०० चौरस फूट दगडी बँकेचे बाजारमूल्य आजच्या घडीला एक लाख चौरस फुटाप्रमाणे सुमारे ६५ कोटी रूपयांपर्यंत आहे. तरीही जिल्हा बँकेचे संचालक मंडळ ती जागा २२ कोटीत विक्री करण्याच्या तयारीत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना आमदार खडसे आणि पालकमंत्री पाटील यांना प्रत्युत्तर दिले.
जिल्हा सहकारी बँकेने जुन्या दगडी बँक शाखेची इमारत विकण्याचा निर्णय घेतला असला, तरी सरकारी नोंदणीकृत मूल्य निर्मात्यांकडून आलेल्या रेडीरेकनर दराच्या अहवालाची माहिती घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आम्ही दगडी बँकेची जागा २० कोटी रूपयांत विकणार असल्याचे कोणत्याच संचालकाने म्हटलेले नाही, असे संजय पवार म्हणाले. आमदार खडसे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ती जागा सुमारे ६५ कोटींत विकली जाऊ शकते, असा दावा केला आहे.
पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. दोघेही जिल्हा बँकेच्या कामकाजाचा आढावा घेऊ शकतात. वर्तमानपत्रांत जाण्यापेक्षा दोघांनी आम्हाला सरळ त्यांच्याकडे बोलावून किंवा थेट जिल्हा बँकेत येऊन दगडी बँक इमारतीच्या विषयावर चर्चा केली तर बरे होईल. दोघांनी त्यांच्या म्हणण्यानुसार दगडी बँकेला ६० ते ६५ कोटींची किंमत देणारा एखादा मोठा ग्राहक आणावा. आम्ही तेवढ्या किंमतीत जागा विकण्यास तयार आहोत. दोन्ही नेत्यांनी चांगली किंमत मिळवून दिल्यास जिल्हा बँकेचा सुमारे ९१ कोटींचा संचित तोटा तितका कमी होईल. इमारत विक्रीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे, असेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष पवार यांनी नमूद केले.