जळगाव – शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकर यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि चित्रफिती आढळल्याचा खळबळजनक आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनीही आता चाकणकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मग तो माझा जावई का असेना, असे बोलून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांकडून रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीवर पोलिसांना धाड टाकली असता तिथे दोन महिला उपस्थित होत्या. तसेच खेवलकर यांच्या घरातून जप्त केलेल्या भ्रमणध्वनीमध्ये महिलांसोबत केलेल्या चॅटचे स्क्रिनशॉट, पार्टीची छायाचित्रे, चित्रफिती तसेच महिलांचे नग्र आणि अर्धनग्रन छायाचित्र आणि काही अशोभनीय कृत्याच्या चित्रफिती आढळून आल्या आहेत. आता याच मुद्द्यावरुन रुपाली चाकणकर यांनी अनेक खळबळजनक आरोप करून हे प्रकरण तापवले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी जावयाची बाजू उचलून धरतानाच चाकणकर यांना तुम्ही अशा प्रकारे बोलता जशा काही स्वतः चौकशी अधिकारी आहात, असा टोला हाणला आहे. मुक्ताईनगरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
रूपाली चाकणकर जी काही माहिती देत आहेत, वास्तविक ती माहिती पोलिसांनी द्यायला पाहिजे. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्या, तरी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचा संताप याच्यासाठी आहे की त्यांचे आणि रोहिणी खडसे यांचे अतिशय मैत्रीपूर्ण (?) संबंध आहेत. आणि हे सर्वांना माहिती आहे. परंतु, त्यांनी सत्य तर बोलावे. मी स्वतः जावयाचे समर्थन करणार नाही. माझे एकच म्हणणे आहे, या प्रकरणाची एसआयटी चौकशी कशाला करता थेट सीबीआय चौकशी करा. परंतु, पोलिसांनी हे सांगावे की अमुक एक महिलेची तक्रार आली. ते आता जेवढी माहिती देत आहेत ती सर्व खासगी स्वरूपाची आहे. आणि एखाद्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही, अशी टीका करून खडसे यांनी पुणे पोलिसांच्या तपास कार्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पोलिसांना आणखी काही सांगायचे असेल तर त्यांनी प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. समाजासाठी हे अत्यंत घातक आहे. तो माझा जावई असो की आणखी दुसरा कोणी. त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी माझी मागणी त्यानंतर असेल. परंतु, गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना बदनाम करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे, तो योग्य नाही. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन कोणाची तक्रार असेल तर पुरावे सादर करावेत. अन्यथा कोणाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलू नये, असेही खडसे म्हणाले.
प्रांजल खेवलकर यांच्या भ्रमणध्वनीमध्ये अश्लील चित्रफिती तसेच छायाचित्रे मिळाल्याचे रूपाली चाकणकर यांना कसे काय माहिती. भ्रमणध्वनीमध्ये तसे काही असेलही, पण ते चाकणकर यांनी का सांगावे. पोलिसांनी काय ती माहिती गुन्हा दाखल करून सांगायला पाहिजे. भ्रमणध्वनीमध्ये काही तरी आढळणे हे त्यांचे खासगी आयुष्य आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत चाकणकर किंवा पोलीस त्या विषयावर काहीच बोलू शकत नाही. जर तो चौकशीत दोषी आढळला तर त्याला फाशीची शिक्षा द्या. जेणेकरून अशा प्रकारचे दुष्कृत्य दुसरे कोणी करणार नाही. मी जावयाचे समर्थ करणार नाही, असे सुद्धा एकनाथ खडसे यांनी ठणकावून सांगितले.