जळगाव : राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून ६७ ग्रॅम सोने, ७.५ किलो चांदी, ३५ हजार रूपये रोख, सीडी, पेन ड्राईव्ह आणि महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची घटना गेल्या मंगळवारी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, सुमारे सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जळगाव शहरातील मू. जे. महाविद्यालय परिसरातील शिवरामनगरात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात दिवाळीच्या काळात चोरीची घटना घडली होती. खडसे कुटुंबीय मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे वास्तव्यास असल्यामुळे जळगावमधील त्यांचा बंगला बहुतांश वेळा रिकामाच असतो. बंगल्याची देखभाल करण्यासाठी नेमलेला केअरटेकरही त्या काळात निवांत होता. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी रेकी करून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बंगल्यात प्रवेश केला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत घुसल्यानंतर चोरट्यांनी एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या खोल्यांतील कपाटे उघडून त्यातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या. अंदाजे ६७ ग्रॅम सोनं, साडेसात किलो चांदी, सुमारे ३५ हजार रुपये रोख रक्कम, सीडी, पेन ड्राइव्ह तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे, असा एकूण मौल्यवान ऐवज चोरून नेला.
पोलिसांनी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर तपासाचा भाग म्हणून आमदार खडसे यांच्या मुक्ताई बंगल्याच्या परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रीकरण बारकाईने पाहिले. तेव्हा जळगाव शहरातील नातेवाईकांकडे आलेल्या उल्हासनगरातील तिघांनी खडसे यांच्या बंगल्यात धाडसी चोरी केल्याचे आढळले. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे माग काढला असता, जळगावमध्ये आल्यानंतर रात्रीच्या वेळी तिघांनी आमदार खडसे यांच्या शिवराम नगरातील बंगल्यावर चोरी केल्याचे स्पष्ट झाले. जळगावमधील नातेवाईकाकडे त्यांच्या बॅगा आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आढळून आली. तेव्हापासून तिघांचा शोध घेण्यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईतील उल्हासनगरकडे रवाना झाले होते.
गुन्ह्यात जियाउद्दीन शेख (३९, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याने खडसेंच्या बंगल्यावर चोरी करणाऱ्यांना मदत केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, जियाउद्दीनला आधीच अटक करण्यात आली होती. तसेच गुन्ह्यात वापरलेली त्याची दुचाकी जप्त केली होती. मुख्य संशयिताचा शोध घेत असताना पोलिसांना चोरीचा मुद्देमाल कल्याणमधील एका सोनाराकडे विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तपासाला गती दिल्यावर चिराग इकबाल सैयद (२२, रा. उल्हासनगर) यास ताब्यात घेण्यात आले. त्यानेच कल्याण येथील सोनार कैलास खंडेलवार याला संपूर्ण मुद्देमाल विकल्याची कबुली दिली. दम दिल्यावर सोनाराने सर्व मुद्देमाल काढून दिला. पोलिसांनी चिराग सैयद आणि कैलास खंडेलवार यांनाही अटक केली. सोनाराकडून सोन्याची लगड, कानातील रिंग, कर्णफुले, गोल कडे, साखळी आणि चांदीची गणेश मूर्ती, असा सुमारे सहा लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला.
पोलीस तपासात एकनाथ खडसेंच्या बंगल्यावरील चोरीत मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी आणि बाबा (सर्व रा. उल्हासनगर) यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
