लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्यात एकहाती सत्ता मिळवणाऱ्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून पेच निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मंगळवारी दुपारी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन घेत रुद्राभिषेक केला. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकल्प सोडला. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही महापूजा केली.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन, पूजाविधीसाठी राजकीय नेत्यांची रिघ लागली होती. निकाल लागल्यानंतरही हा ओघ थांबलेला नाही. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या कुटूंबातील काही सदस्यांसमवेत त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या. त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. रुद्राभिषेक करून आरती केली. संकल्प सोडला, असे पुरोहितांकडून सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते. एकादशीनिमित्त शिंदे कुटूंबिय दर्शनासाठी आले होते, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-नाशिक : दिवसा घरफोडी करणारा जाळ्यात, १७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या दौऱ्याआधी सकाळीच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे महापूजा केली. अडीच वर्षांपूर्वी शिंदे यांच्या निर्णयामुळे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. त्यांच्याबरोबर आलेले सर्व आमदार आणि खासदारांना त्यांनी एकसंघ ठेवले. राज्यातील महिला वर्गाची शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा असल्याचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.