जळगाव – जिल्ह्यातील अमळनेरमधील भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या बरोबर जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचे सदस्य, सभापती तसेच माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले.

माजी आमदार चौधरी यांचा पक्ष प्रवेश जळगावमधील मेळाव्यात काही दिवसांपूर्वी होणार होता. मात्र, ऐनवेळी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे यांचे दोन वेळा दौरे रद्द झाल्याने तो होऊ शकला नाही. अखेर मंगळवारी चौधरी यांनी मुंबईत शिंदे गटात प्रवेश करून भाजपला धक्का दिला.

यावेळी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संतोष बांगर, आमदार अमोल पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, माजी आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थित होते. माजी आमदार चौधरी यांच्याबरोबर ठाकरे गटाचे अमळनेरमधील माजी शहर प्रमुख प्रवीण पाठक, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन, माजी सभापती श्रीराम चौधरी, माजी सभापती देविदास महाजन, माजी नगरसेवक पंकज चौधरी, गुलाब पाटील, महेश जाधव, किरण बागुल, बाळासाहेब संघनाशिव, साखरलाल महाजन आणि इतर असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या इराद्याने कोणीही कसाही असला, तरी त्याला पक्षात घेण्याची रणनिती भाजपने आखली आहे. असे असताना, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजप सोडून शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. माजी आमदार चौधरी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

२०१४ मध्ये पहिल्यांदा अमळनेरमधून अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर चौधरी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देखील दिली. परंतु, राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल पाटील यांनी त्यांचा त्यावेळी पराभव केला होता. २०२४ च्या निवडणुकीत अमळनेरची जागा अजित पवार गटाला सुटल्याने माजी आमदार चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली. परंतु, या वेळी त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती तसेच नगर परिषदेच्या निवडणुकीत आपले संख्याबळ वाढविण्याची संधी त्यामुळे शिंदे गटाला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थातच, आगामी काळात महायुतीचे घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची अमळनेरमध्ये डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. कारण, माजी आमदार चौधरी यांचा त्या तालुक्यात बराच मोठा समर्थक वर्ग आहे.