नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुरू झाले असताना सुमारे चार दशकांपासून नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्षपद सांभाळणारे सतीश शुक्ल यांच्या एककल्ली आणि एकतर्फी कारभारावर टिकास्त्र सोडत एका गटाने त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला. पुरोहित संघाचे नवीन अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पंचाक्षरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीस १०० हून अधिक सभासद उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, अविश्वास ठराव व अध्यक्ष निवडीसाठी झालेली सभा अनधिकृत असल्याने या निवडीला कुठलाही अर्थ् नसल्याचा दावा शुक्ल यांनी केला. आरोप-प्रत्यारोपांनी नाशिक पुरोहित संघात दुफळी निर्माण झाली आहे.

नाशिक पुरोहित संघाशी ३५० घराणे जोडलेले असून यातील जवळपास २०० सभासद आहेत. सिंहस्थ काळात सभासद संख्येत वाढ होते. इतरवेळी ती कमी असते, असे सांगितले जाते. जवळपास ३८ वर्षांपासून संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सतीश शुक्ल सांभाळत आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी वाढली होती. नुकत्याच झालेल्या कुंभमेळा नियोजन बैठकीत सतीश शुक्ल यांनी कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले, असा आरोप अनेक सदस्यांनी केला होता. संघाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याची तक्रारही करण्यात येत होती. संघाच्या कामकाजात स्वतः आणि आपल्या मुलापुरता मर्यादित सहभाग ठेवणे, इतर सभासदांना दुर्लक्षित करणे यामुळे अनेक सदस्य नाराज होते.

या पार्श्वभूमीवर बैठकीत सतीश शुक्ल यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदी चंद्रशेखर पंचाक्षरी यांची बिनविरोध निवड झाली. पंचाक्षरी हे अनेक वर्षांपासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक धार्मिक समित्यांमध्ये जबाबदारी सांभाळली असून त्यांचा संघात मोठा जनाधार आहे.

पुरोहित संघाच्या कामकाजात पारदर्शकता, एकजूट आणि सर्वसमावेशकता ठेवून पुढे वाटचाल केली जाईल. सर्व सभासदांचा सल्ला आणि सहभाग घेऊन निर्णय घेण्यावर आपला भर राहील. – चंद्रशेखर पंचाक्षरी (नवीन अध्यक्ष, नाशिक पुरोहित संघ).

अविश्वास ठराव आणि नवीन अध्यक्ष निवडीसाठी झालेली सभा घटनेतील प्रक्रियेनुसार झालेली नाही. बैठक अनधिकृत आहे. त्यामुळे त्यातील निवडीला अर्थ नाही. मतभेद झालेल्या लोकांनी एकत्र येऊन हा प्रकार केला. ज्यांनी आता अध्यक्षपदावर दावा सांगितला, त्यांच्यासाठी आपण कार्यकारी मंडळात कार्याध्यक्षपद तयार करून त्यांना बहाल केले होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे दायित्व आपल्यावर आहे. ध्वजवंदनापासून अन्य सर्व कार्यक्रम उत्तमप्रकारे पार पाडायचे आहेत. सिंहस्थ नियोजन बैठकीत आपण आग्रह धरूनही प्रशासनाने निवडक प्रतिनिधींना निमंत्रित केले. पद घेऊन फलकबाजीची काहींना हौस आहे. या प्रक्रियेला कायदेशीर आव्हान दिले जाईल. – सतीश शुक्ल (अध्यक्ष, नाशिक पुरोहित संघ).