मालेगाव : वडिलोपार्जित शेतीच्या वादातून निर्माण झालेले भांडण विकोपाला जाण्याच्या घटना नवीन नाहीत. त्यातून हाणामाऱ्या आणि अगदी जीव घेण्यापर्यंत लोकांची मजल जाण्याचे प्रसंगही अधूनमधून समोर येत असतात. नाशिकच्या येवला तालुक्यातील सोमठाणदेश येथे वडिलोपार्जित शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा असाच सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

केवळ दैव बलवत्तर म्हणून ऐनवेळी गावकरी धावून आले आणि खून करण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळेच शेतकरी व त्याच्या कुटुंबियांचा या घटनेत सुदैवाने जीव बचावला. पळालेला हल्लेखोरांना नंतर पोलिसांनी अवघ्या तासाभरात जेरबंद केले.

सोमठाणदेश येथील गौरव दत्तू सोनवणे या शेतकऱ्यावर दोन वाहनातून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला चढविण्यात आल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. तेव्हा गावकरी घटनास्थळी धावून आल्यामुळे हल्लेखोरांना तेथून पलायन करावे लागले परंतु हल्ल्यात गौरव हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी या हल्ल्याची आणि हल्लेखोर कोपरगावच्या दिशेने पळाल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे पोलिसांना दिली. त्यानुसार येवला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ८ हल्लेखोरांना पकडले. दोन संशयित मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. हल्लेखोरांची कसून चौकशी केली असता गौरव सोनवणे व त्यांचा भाऊबंद प्रमोद कचरू सोनवणे (वाटापूर, जिल्हा अहिल्यानगर) याच्यात सोमठाणदेश येथील वडिलोपार्जित शेतीविषयी वाद आहेत. त्यातून प्रमोद याने गौरव व त्याच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्यासाठी अहिल्यानगर येथील गुंडांना सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

राजेंद्र जगताप (२७,करंजगाव नेवासा), विलास आयनर (३३, अमळनेर नेवासा), प्रमोद सोनवणे (३०, वाटापुर नेवासा), हरिहर ओटे (२३, वाटापुर नेवासा), अक्षय राजळे (२३, वळण पिंपरी राहुरी), शरद चोपडे (४१, वाटापुर नेवासा), साहिल मेहताब(१९, खेडवे नेवासा) व प्रदीप वायकर (२६, तामसवाडी नेवासा) अशी पकडण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. यातील सहा ते सात संशयीतांविरुध्द अहिल्यानगर मधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, चोरी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील चौघे पंधरा दिवसापूर्वीच खुनाचा प्रयत्न केल्याच्या एका गुन्ह्यात जामिनावर बाहेर आले आहेत.

पकडण्यात आलेल्या हलेखोरांकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे,दोन लोखंडी कोयते, लोखंडी पाईप, पाच लाकडी दांडके, दोन चार चाकी वाहने व आठ भ्रमणध्वनी असा १६ लाख ११ हजार ४५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या हल्ल्यात गौरव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक व उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर यांच्या पोलीस पथकाने हल्लेखोरांना पकडण्याची कामगिरी बजावली.