नाशिक – दीपावलीच्या पार्श्वभूमीवर, सलग आठ दिवस बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने गुरुवारी अनेक ठिकाणी कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत दोन दिवसांत पाच ते सहा हजार क्विंटलने आवक वाढली. आवक वाढल्याने दरावर परिणाम होऊन ते प्रति क्विंटलला १०७५ रुपयांवर आले. कांदा विक्रीसाठी गर्दी होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.

दिवाळीमुळे लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांचे कामकाज शुक्रवारपासून म्हणजे १७ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत बंद राहणार आहे. या काळात कांदा लिलाव होणार नाहीत. या संदर्भातील माहिती आधीच जाहीर झालेली असल्याने गुरुवारी सकाळपासून कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनांची बाजार समित्यांमध्ये गर्दी होऊ लागली.

लासलगाव समितीत दिवसभरात १७ हजार २२२ क्विंटलची आवक झाली. त्यास किमान ४००, कमाल १४८० आणि सरासरी १०७५ रुपये भाव मिळाला. या समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत आवक पाच ते सहा हजार क्विंटलने वाढली. दरात काहिशी घसरण झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. अन्य बाजार समित्यांमध्ये वेगळी स्थिती नव्हती. आठ दिवस कांदा लिलाव बंद राहणार असल्याने शेतकरी वर्गाने शक्य तितका माल बाजारात विक्रीस नेण्यास प्राधान्य दिल्याचे पहायला मिळाले.

सध्या उन्हाळ कांदा बाजारात येत आहे. सलग चार ते साडेचार महिने पाऊस राहिल्याने चाळीत साठवलेला कांदा बराचसा खराब झाला. सप्टेंबरमधील अतिवृष्टीचाही त्याला फटका बसला. संपूर्ण हंगामात कांद्याला एक ते दीड हजार रुपयांदरम्यान दर मिळाले. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. चाळीत साठवलेला माल आठ दिवस विकता येणार नाही.

दिवाळीनंतर खरीपातील लाल कांदा बाजारात येऊ लागतो. तो आल्यानंतर उन्हाळची मागणी एकदम घसरते. आवक वाढण्यामागे हे कारण असल्याची शक्यता आहे. लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी कांदा आवक वाढण्यामागे दिवाळीचे कारण असल्याचे नमूद केले. दिवाळीत खर्चासाठी पैसे लागतात. त्यामुळे चाळीतील शिल्लक माल काढून टाकला जात आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस झाला तर, कांदा खराब होऊ शकतो. यामुळे आवक वाढल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

दिवाळीनंतर प्रारंभी नवीन लाल कांदा बाजारात हळूहळू येतो. आवक कमी असल्यास व्यापारी तो खरेदीस धजावत नाही. कारण, त्यांना गाडी भरण्यासाठी किमान ३० क्विंटल किमान कांदा लागतो. त्यामुळे प्रारंभी येणारा लाल कांदा स्थानिक बाजारात विकण्यासाठी खरेदी होतो. मुबलक माल येईपर्यंत व्यापारी प्रतिक्षा करतात, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.