जळगाव – सणासुदीचा काळ असल्याने केळीला बाजारात सध्या चांगली मागणी असली, तरी मागणीच्या तुलनेत फार आवक नाही. तरीही केळीला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विशेषतः बऱ्हाणपूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी केळी भावाचा पार कचरा करून टाकला आहे.

रावेर, यावल,  मुक्ताईनगर आणि इतर काही तालुक्यांमधील मृग बाग केळीची काढणी आता जवळपास आटोपली आहे. त्यानंतर आता चोपडा, जामनेर, जळगाव या तालुक्यातील कांदेबाग केळीची काढणी सुरू झाली आहे. त्यातही केळीची खूपच कमी आवक सध्या बाजारात सुरू आहे. महिनाभरापूर्वी ज्या बऱ्हाणपूर बाजार समितीत २०० ते २५० ट्रक (१० टन क्षमता) केळीची आवक सुरू होती, त्याठिकाणी आता जेमतेम ८० ते ८५ ट्रक केळीची आवक होत आहे.

रावेरमध्येही सध्या तीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर, मागणीच्या तुलनेत केळीची आवक नसल्याने चांगला भाव मिळण्याची आशा शेतकरी बाळगून आहेत. प्रत्यक्षात बऱ्हाणपुरात सद्यःस्थितीत ५३६ ते ५६० एवढा निच्चांकी भाव केळीला मिळत आहे. अपवादा‍त्मक परिस्थितीत उच्च दर्जाच्या मालास बऱ्यापैकी म्हणजे एक हजारांपेक्षा अधिक भाव व्यापारी देताना दिसत आहेत.

सततच्या पावसासह ढगाळ हवामानामुळे करपाचा प्रादुर्भाव वाढल्याने रावेरसह यावल, मुक्ताईनगर तालुक्यातून जेवढी काही केळी सध्या निघत आहे, तिचा दर्जा काही प्रमाणात खालावला आहे. या केळीला व्यापारी सध्या अजिबात विचारण्यास तयार नाहीत. कमी दर्जाची केळी उत्तर भारतात पाठविल्यावर ती वाटेतच पिकते किंवा खराब होण्यास सुरूवात होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, व्यापारी सध्या केळीचा उठाव कमी असल्याचे सांगून कमी दरात केळीची खरेदी करीत आहेत. याचा फटका जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादकांना बसला आहे.

जळगावमधील केळी उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून दरातील घट आणि बाजारातील अनियमिततेमुळे चिंतेत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांत केळीला समाधानकारक भाव मिळत होते. मात्र, जूनपासून केळी दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या बाजार समित्यांकडून जाहीर होणारे दर केवळ कागदावरच राहत आहेत. प्रत्यक्षात व्यापारी त्या दराने केळी खरेदी करत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार कायम आहे.

जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांनी संयुक्त बैठक घेऊन केळी खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न केले होते. तथापि, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरही कोणताही ठोस बदल केळी भावात दिसून आलेला नाही. व्यापाऱ्यांची मनमानी सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.