मालेगाव : लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणावरून चक्क गोळीबार व जबर मारहाण करण्याचा प्रकार शहरात घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयीत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. संशयीताच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

आयेशा नगरातील सुफिया मशिदीजवळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकाच गल्लीत वास्तव्यास असणाऱ्या दोन लहान मुलांमध्ये कोणत्यातरी कारणास्तव तीन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. हे भांडण मिटलेही होते. मात्र त्याचा राग मनात ठेवून एका मुलाचा बाप असलेल्या मेहताब अली याने दहा-बारा साथीदारांना सोबत घेऊन भांडण झालेल्या दुसऱ्या मुलाचे वडिल लईक अहमद मोहम्मद कामील यांच्या घरी जाऊन भांडण केले. यावेळी लईक यांच्या दिशेने गोळीबार करत दोन गोळ्या झाडल्या परंतु, त्याचक्षणी खाली बसल्याने या हल्ल्यातून आपण सुखरूप बचावल्याचे लईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी संशयीतांनी हातात पिस्तूल व धारदार तलवारी मिरवत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच संशयीतांनी आपणास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घरातील सामानाची नासधुस केली. घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीचे तसेच अन्य चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याचे लईक यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी आयेशा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांनी संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी लागलीच दोन पोलीस पथके रवाना केली होती. यातील मुख्य संशयीत मेहताब अली हा पळून जाण्याच्या तयारीत असताना अवघ्या अवघ्या दोन तासातच त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल पथकातील पोलिसांनी जप्त केला. त्याचे अन्य साथीदार मात्र फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेला संशयीत मेहताब अली उर्फ मेहताब दादा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी आयेशा नगर, आझाद नगर व छावणी पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगा, दुखापत यासारखे एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलीस अंमलदार सचिन बेदाडे, दिनेश शरावते, राकेश जाधव, अक्षय चौधरी, राम निसाळ, राकेश उबाळे, निलेश निकम, हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांनी संशयीताला अटक करण्याची व त्याच्याकडून घातक अग्निशस्त्रे जप्त करण्याची कारवाई केली आहे.