लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: गुलाबभाऊ पाणी द्या… पाणी द्या… असा टाहो फोडत सोमवारी दुपारी मन्यारखेडा येथील आदिवासी बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर रोष व्यक्त केला. यावेळी मंत्री पाटील यांचा मुखवटा घालून एका कार्यकर्त्याने आदिवासी बांधवांची माफी मागत दोन-तीन दिवसांत पाणीप्रश्‍नासह इतर समस्या सोडविण्याबाबत आश्‍वस्त करीत पाणीपुरवठा मंत्र्यांना एकप्रकारे चिमटाच काढला. पाच दिवसांत गावात सुविधा न पुरविल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात येत असलेल्या व जळगाव शहरापासून अवघ्या आठ किलोमीटवरील मन्यारखेडा येथील आदिवासी बांधव पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आता पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. मूलभूत सुविधांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, रत्नाकर अहिरे, महेश माळी यांनी केले.

आणखी वाचा-“हे तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे सरकार”, अजित पवार यांची हतगड मेळाव्यात टीका

आकाशवाणी चौकापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी मोर्चाला अडविले. मोर्चेकर्‍यांनी प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडला. त्यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गुलाबभाऊ पाणी द्या… पाणी द्या, गुलाबभाऊ वीज द्या… वीज द्या… गुलाबभाऊ डोक्यावर छत द्या… छत द्या… आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. याप्रसंगी जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, ललित शर्मा, महानगर संघटक प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, राहुल चव्हाण आदींसह मन्यारखेडा गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते. मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

आणखी वाचा-नाशिक: वाहनातून एटीएम यंत्र पळविले, पोलिसांना गुंगारा देत पोबारा

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मन्यारखेडा गावात बहुतेक आदिवासी समाजबांधवांचे वास्तव्य असून, ते गेल्या बारा वर्षांपासून राहत आहेत. सद्यःस्थितीत आदिवासी बांधव विविध मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. गावात विकासाच्या नावाची बोंबाबोंब दिसून येते. तेथे मूलभूत सेवा-सुविधांची वानवा आहे.सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी महिला, युवती, विद्यार्थिनीची प्रचंड कुचंबना होत आहे. पाणीप्रश्‍न चांगलाच भेडसावत आहे. पाण्यासाठी आदिवासी बांधवांना भटकंती करावी लागत आहे. वर्षानुवर्षांपासून हीच स्थिती आहे. गावात पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही. वीजखांबही नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून आदिवासी बांधव अंधारात राहत आहेत. गावात रस्तेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामस्थांना कसरत करावी लागते. पाणीपुरवठामंत्री पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात येत असलेल्या या गावात पाणी मिळत नसेल, तर उर्वरित गावांचे काय? गावातील समस्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आदिवासी बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हाक दिली. गावातील वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा पाच दिवसांच्या आत न पुरविल्यास आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

मुखवटाधारी कार्यकर्त्याकडून गुलाबराव पाटलांना चिमटा!

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मुखवटा व वेश परिधान करीत कार्यकर्ता मोटारीतून येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आला. तेथे मंत्री पाटील यांच्या शैलीने मोर्चेकर्‍यांशी संवाद साधला. तत्पूर्वी, मुखवटाधारी कार्यकर्त्याने डोक्यावर हंडा घेतला. त्यावेळी मोर्चेकर्‍यांनी गुलाबभाऊ पाणी द्या… पाणी द्या… अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत मन्यारखेडा गावात मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्‍वस्त करीत त्या कार्यकर्त्याने एकप्रकारे मंत्री पाटील यांना चिमटाच काढला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For water supply handa march by mns in jalgaon mrj
First published on: 05-06-2023 at 16:13 IST