जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या इराद्याने कोणीही कसाही असला, तरी त्याला पक्षात घेण्याची रणनिती भाजपने आखली आहे. असे असताना, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भाजप सोडून शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, चौधरी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे कारण स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येकी पाच मतदारसंघातील जागा जिंकून भाजपसह शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी जेवढ्या काही ठिकाणी शिंदे गटाचे सध्या वर्चस्व आहे तिथे भाजपने आपली माणसे पेरण्यास यापूर्वीच सुरूवात केली आहे. शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे गटानेही आता शांत न बसता भाजपला धक्का देण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी अमळेरमधील भाजप समर्थक माजी आमदार शिरीष चौधरी यांना आपल्या पक्षात घेण्याच्या हालचाली मंत्री गुलाबराव पाटील यांनी वाढविल्या आहेत. माजी आमदार चौधरी हे त्यांच्या नंदुरबारसह अमळनेरमधील समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुंबईत मंगळवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
अमळनेरमध्ये एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी माजी आमदार चौधरी यांच्या कार्यालयास आवर्जून भेट दिली. त्यांच्याशी पक्ष प्रवेशासह नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत शिंदे गटाचे वर्चस्व वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा केली. चौधरी यांचा पक्ष प्रवेश जळगावमधील मेळाव्यात होणार होता. मात्र, ऐनवेळी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन वेळा दौरे रद्द झाल्याने तो होऊ शकला नाही. या दरम्यान, दिवाळीनंतर शिंदेंचा दौरा आणि चौधरी यांच्या पक्ष प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त झाली होती. मात्र, तत्पूर्वीच मंगळवारी मुंबईत मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनात त्यांचा शिंदे गटातील प्रवेश सोहळा आयोजित केला गेला आहे. त्या बाबतची माहिती स्वतः माजी आमदार चौधरी यांनी समाज माध्यमावर दिली आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१४ मध्ये पहिल्यांदा अमळनेरमधून अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर चौधरी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देखील दिली. परंतु, राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल पाटील यांनी त्यांचा त्यावेळी पराभव केला होता. २०२४ च्या निवडणुकीत अमळनेरची जागा अजित पवार गटाला सोडण्यात आल्याने चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली. परंतु, या वेळीही त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.
अमळनेरसह नंदुरबारमध्ये आतापर्यंत भाजपचे जोमाने काम केले. परंतु, दोन्ही ठिकाणच्या स्थानिक राजकारणाला कंटाळून आता मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत. –शिरीष चौधरी (माजी आमदार, अमळनेर)