मालेगाव : येथील माजी आमदार व इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांनी भारतीय जनता पार्टीची ‘फिरकापरस्त’ पार्टी म्हणून संबोधना केली. त्यामुळे खवळलेल्या स्थानिक भाजप नेत्यांनी शेख यांच्यावर सडकून टीका केली होती. शेख यांचे राजकारण व त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आणू असा थेट इशाराही या नेत्यांनी देऊन टाकला होता. त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देत शेख यांनी संबंधित भाजप नेत्यांवर तोंडसुख घेतले आहे. भाजप नेत्यांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारत असल्याचे सांगत शेख यांनी या नेत्यांना आता प्रतिआव्हान दिले आहे.

मालेगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे. या रचनेवरून राज्यात सत्ताधारी असलेले पक्ष व विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. ही प्रभाग रचना निष्पक्ष पद्धतीने झाली नाही. सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत लाभ पोहोचावा या दृष्टीने ही रचना झाली आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी केलेल्या हरकतींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले. तसेच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून ही रचना केली गेली, असा आक्षेप विरोधकांकडून घेतला जात आहे. याच अनुषंगाने माजी आमदार व मालेगावमधील ‘इस्लाम’या स्थानिक पक्षाचे संस्थापक आसिफ शेख यांनी भाजपवर टीका केली होती. ‘फिरकापरस्त’ असलेला हा पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम करतो, असा आरोप शेख यांनी केला होता.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, महानगरप्रमुख देवा पाटील, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कमलेश निकम, प्रांतिक सदस्य लकी गिल, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन शेख यांच्या या आरोपांचा खरपूस समाचार घेतला होता. भाजपवर जातीयवादाचा आरोप करणारे शेख हे स्वतःच जातीय राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा टोला लगावत शेख यांच्या इस्लाम पार्टीला आगामी महापालिका निवडणुकीत ४-५ जागा देखील मिळणार नाहीत, असे भाकीत या नेत्यांनी वर्तविले होते. शेख यांनी भाजपची बदनामी करू नये, अन्यथा त्यांना मालेगावात फिरू दिले जाणार नाही, त्यांच्या पक्षाची अस्तित्व संपवून टाकू,असा इशाराही या नेत्यांनी दिला होता.

भाजपची ही टीका व आव्हानाला शेख यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना जनमानसात अजिबात स्थान नाही, त्यामुळे मी त्यांना कवडीची देखील किंमत देत नाही. केवळ स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी त्यांनी माझ्यावर टीकाटिप्पणी केली आहे,असा घणाघात शेख यांनी केला. शहराच्या मुस्लिमबहुल पूर्व भागात भाजपचे अस्तित्व नाहीच,परंतु पश्चिम पट्टयातही भाजपची स्थिती खालावली आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपने मालेगाव महापालिकेच्या ८४ पैकी २५ जागा लढवून आणि त्यातील ५ जागा जिंकून दाखवाव्यात,असे आव्हान शेख यांनी दिले आहे.

भाजपची बदनामी थांबवली नाही तर शेख यांना मालेगावात फिरू दिले जाणार नाही, अशा स्वरूपाचे भाजप नेत्यांनी दिलेले आव्हान देखील शेख यांनी स्वीकारले आहे. भाजप नेत्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी आपल्याला स्थळ आणि वेळ कळवावी, ते जिथे सांगतील तेथे जाण्यासाठी मी कधी पण तयार आहे, असे प्रतिआव्हान शेख यांनी दिले आहे.