जळगाव : जिल्ह्यातील दोन माजी मंत्री तसेच दोन माजी आमदारांनी पक्ष सोडल्याने बसलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी (शरद पवार) जेमतेम सावरली होती. त्यानंतर रावेरचे माजी आमदार अरूण पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून आणखी दुसरा धक्का दिला. दरम्यान, भाजपमध्ये घरवापसी केल्यानंतर पाटील यांनी आता स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व वाढविण्यास सुरूवात केली आहे.
माजी आमदार अरुण पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपच्या माध्यमातून केली होती. भाजपमधील सक्रिय कामांमुळे त्यांना दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र, २००९ मध्ये पक्षातील मतभेद वाढल्याने त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःची ओळख मजबूत केली आणि पक्षात फूट पडली तरी शरद पवार गटाशी निष्ठा कायम राखली. परंतु, गेल्या काही वर्षांत पक्षातील गटबाजी आणि वाढत्या दुफळीमुळे ते हळूहळू निष्क्रिय झाले. विधानसभा निवडणुकीनंतर तर त्यांनी पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहणे सुद्धा टाळले. राजकारणातली त्यांची उपस्थितीही लक्षणीयरीत्या कमी झाली.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील आणि दिलीप सोनवणे यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार गटाचा ध्यास घेतला होता. तेव्हाही माजी आमदार अरुण पाटील हे शरद पवार गट सोडणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, त्या अफवांना पूर्णविराम देत त्यांनी कोणत्याही नव्या पक्षात प्रवेश न करता थेट भाजपमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांसह मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात औपचारिकरित्या प्रवेश करून पुन्हा एकदा भाजपशी नाळ जोडली. भाजपमध्ये रूळल्यानंतर माजी आमदार पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रावेर तालुक्यात आपल्या कार्याची चुणुक दाखविण्यास आता सुरूवात केली आहे.
दरम्यान, माजी आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिला भूकंप रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तांतराने झाला आहे. बाजार समितीचे सभापती सचिन पाटील आणि उपसभापती योगेश पाटील मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून बहुतांश संचालकांनी बंड पुकारले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन्ही पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर बहुमताने सत्तांतर देखील झाले. सहकारात सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागते. परंतु, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाधिकारशाही सुरू होती. त्यामुळे सर्व संचालकांनी एकमताने सत्तांतर करून दाखवले. या माध्यमातून आम्ही सहकाराला लागलेली कीड काढली, असे वक्तव्य माजी आमदार अरूण पाटील यांनी केले.