जळगाव – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह सहा वारसांची मालकी असलेली दोंडाईचा (जि. धुळे) येथील सुमारे ३३ एकराहून अधिक शेती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने बळकावल्याचा गंभीर आरोप येथे करण्यात आला आहे.
दोंडाईचा येथील जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप पणन व राजशिष्टाचार मंत्री रावल यांच्या कुटुंबावर करण्यात आला असून, किशोरसिंग पाटील आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी तो जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा लगतच्या मालपूर गावाच्या परिसरात असलेल्या ३३ एकर २० गुंठे शेत जमिनीचा वाद बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. नारायणसिंग पाटील यांच्याकडे सदर जमीन वारसा हक्काने आली होती. त्यांच्या निधनानंतर दिलीपसिंग नारायणसिंग पाटील, रणजितसिंग नारायणसिंग पाटील, माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग शेखावत, गजेंद्र नारायणसिंग पाटील, विलासराव नारायणसिंग पाटील आणि अरुणा गुणवंतसिंग पाटील यांची नावे सातबारा उताऱ्यावर वारसा हक्काने नोंदवली गेली. तरी देखील २००७ पासून त्या जमिनीचा ताबा मंत्री रावल यांच्या कुटुंबाकडे असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
दोंडाईचा येथील जमिनीच्या वादावरून मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबाने तोंडी कराराच्या आधारे खरेदीचा दावा स्थानिक न्यायालयात दाखल केला होता. मात्र, सदरचा दावा नंतर फेटाळण्यात आला. त्यामुळे संबंधितांकडून धुळे येथील जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले; परंतु, तिथेही तो दावा फेटाळला गेला. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी आमचे वारसदार कुटुंबीय न्यायालयाच्या बेलीफांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी मालपूर येथे गेले असता, मंत्री रावळ यांच्या समर्थकांनी त्यांना हुसकावून लावल्याचा आरोपही पत्रकार परिषदेतून प्रतिभाताई पाटील यांच्या नातलगांकडून करण्यात आला. या वेळी पोलिसांनी संरक्षण द्यावे, असा न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही पोलीस प्रशासन मंत्री रावल यांच्या कुटुंबाच्या बाजूने उभे राहिल्याचा आरोप देखील किशोरसिंग पाटील आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
दरम्यान, दोंडाईचा येथील शेतीच्या वादाचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. म्हणून त्या संदर्भात झालेल्या आरोपांवर भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याची प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी माध्यमांना दिली आहे. तसेच सदरचे प्रकरण दिवाणी स्वरूपातील असून, संबंधितांच्या तक्रारीवरून रीतसर गुन्हा यापूर्वीच दाखल केला असल्याचे धुळे येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी म्हटले आहे.