नाशिक : मनमाडलगतच्या नागापूर आणि पानेवाडी इंधन प्रकल्पातील टँकर रस्त्यावर उभे केले जात असल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी टँकरच्या काचा फोडत चालकाला मारहाण केल्याची तक्रार करीत तिन्ही इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी सोमवारी सकाळपासून संप सुरु केल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागातील इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नाशिकसह अनेक जिल्ह्यांत इंधन टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

नांदगाव रस्त्यावर नागापूर ते पानेवाडी दरम्यान दुतर्फा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि एचपीसीएल कंपन्यांच्या प्रकल्पातून इंधन वाहतूक करणारे टँकर उभे केले जातात. आपला क्रमांक आल्यावर टँकर प्रकल्पात जातात. वेगाने जाणाऱ्या टँकरने परिसरात अनेक अपघात झाले आहेत. इंधन वाहतूक करणारी वाहने महामार्गावर उभी केली जाऊ नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करावा. रस्त्यावर ते अवैधपणे उभे केल्याने अपघात झाल्यास कंपन्यांच्या अधिकाऱ्ऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पत्र नागापूर ग्रामपंचायतीने मनमाड पोलिसांना दिले आहे.

हेही वाचा >>> “गुलाबराव पाटील यांना संजय राऊतांमुळेच…”, संजय सावंत यांचा मोठा दावा

याच मुद्यावरून नागापूर ग्रामस्थ आणि टँकर चालक-मालक यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जाते. ग्रामस्थांनी काही टँकरच्या काचा फोडल्या. गॅस प्रकल्पातून बाहेर आलेल्या टँकर चालकाला मारहाण केली. या घटनाक्रमानंतर तिन्ही प्रकल्पातील टँकर चालकांनी एकत्र येऊन इंधन भरण्यास नकार दिल्याने पुरवठा थांबला आहे. या प्रकल्पातून सुमारे ५०० टँकर इंधन वाहतूक करतात. इंधन कंपन्यांनी निविदा काढून हे काम दिलेले आहे. इंधन कंपन्यांच्या आवारात वाहनतळाची व्यवस्था आहे. तथापि, चालक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्याची जबाबदारी आमची नसल्याचे सांगत इंधन कंपन्यांनी हात वर केल्याने हा संघर्ष अधिकच वाढल्याचे सांगितले जाते. टँकर चालकांच्या अकस्मात संपामुळे नाशिक, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागातील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे.

हेही वाचा >>> खतांसह कीटकनाशकांचा अवैध साठा; पाच जणांविरुद्ध गुन्हा

…तर पेट्रोल पंप बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनमाडच्या तीन प्रकल्पांतून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जातो. संपामुळे या भागातील इंधन पुरवठा थांबलेला आहे. संपावर लवकर तोडगा न निघाल्यास नाशिक शहरात दुपारनंतर इंधन पुरवठ्याअभावी पेट्रोल पंप बंद होण्यास सुरुवात होईल. तशीच स्थिती उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील संबंधित जिल्ह्यांमध्ये उद्भवू शकते, असे महाराष्ट्र पेट्रोल डिलर संघटनेचे (फामफेडा) राज्य उपाध्यक्ष विजय ठाकरे यांनी म्हटले आहे.