नाशिक – वर्चस्ववाद आणि हप्ता वसुलीवरून दोन गटात मध्यरात्री नाशिक रोड भागात फर्नांडिस वाडी येथे उडालेल्या धुमश्चक्रीत गोळीबार करण्यात आला. संशयितांनी हवेत अनेक फैरी झाडल्याचे सांगितले जाते. यावेळी लाकडी दांडके, धारदार हत्यारांचा वापर करण्यात आला. एका गटाने महिला वकिलाच्या घरावर दगड, बाटल्या फेकल्या. या घटनाक्रमामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नाशिकमधील गुन्हेगारीचा त्रास आता सर्वसामान्यांनाही होऊ लागला आहे.
मध्यरात्री दोन वाजता हे टोळीयुद्ध भडकले. शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना त्यात या घटनेची भर पडली. रात्री दीड ते दोन वाजता रोहित डिंगम आणि राहुल उज्जेनवाल यांच्या गटात ही धुमचक्री उडाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असणारे उपनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे मोठी गर्दी झालेली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल उज्जैनवाल आणि रोहित डिंगम यांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्व, हप्ता वसुलीवरून वाद झाले.
टोळक्यांकडे लाकडी दांडके आणि हत्यारे होती. आपल्या भागात यायचे नाही. या ठिकाणी आपणच भाई आहोत. हप्ता वसुली आपले साथीदार करणार, यावरून उभयतांमध्ये बाचाबाची होऊन संघर्ष झाला. दोन्ही टोळ्यांनी धुडगूस घालत परस्परांवर हल्ला केला. यावेळी गावठी बंदुकीतून १० ते १५ फैरी झाडल्या गेल्याचे सांगितले जाते. डिंगमच्या साथीदारांनी राहुल उज्जैनवालची काकू जस्लीन यांच्या घरावर दगडफेक आणि बिअरच्या बाटल्या फेकल्या. नंतर दोन मोटारीतून ते पळून गेले.
या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल उज्जैनवाल आणि प्रतिस्पर्धी टोळीतील रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, इर्षाद चौधरी, बारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे आणि इतरांनी धुडगूस घालत जिवे मारण्यासाठी गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेचच संशयितांचा शोध सुरू केला. घटनास्थळावरून गोळ्यांच्या काही रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.
महिला वकीलही लक्ष्य
टोळ्यांमधील वादात एका गटाकडून न्यायालयात खटले लढणाऱ्या महिला वकिलही लक्ष्य झाल्याचे समोर आले. संशयित राहुल उज्जैनवालची काकू जस्लीन यांच्या घरावर विरोधी टोळक्याने दगडफेक आणि बिअरच्या बाटल्या फेकल्या. जस्लीन या वकील असून उज्जैनवालचे खटले त्या न्यायालयात लढत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.