नाशिक : गरबा तसेच दांडिया मंडळात थिरकण्यास नाशिककर सज्ज झाले आहेत. नवरात्र उत्सवावर यावेळी समाज माध्यमाचा अधिक प्रभाव असल्याने अगदी पाच वर्षाच्या बालकांपासून वयाची साठी पार केलेले उत्साहात दांडिया, गरबा वर्गात सहभागी होत सराव करत आहेत. गरबा आणि दांडियात करण्यात येणारा पेहराव हा इतरांपेक्षा वेगळा कसा असेल, याकडे आतापासूनच विशेष लक्ष देण्यात येत आहे. सराव वर्गातही त्याविषयी विशेष मार्गदर्शन केले जात आहे.
नवरात्रोत्सवास सोमवारपासून सुरुवात होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातही राजकीय पक्ष तसेच इच्छुकांकडून विशेष तयारी केली जात आहे. त्याचा आपसूकच नवरात्रोत्सव मंडळांना फायदा होत आहे. उत्सवानिमित्त शहरातील सर्व देवी मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते. देवी मंदिरांसमोर किंवा जिथे मोकळे मैदान असेल अशा ठिकाणी गरबा, दांडियावर थिरकणाऱ्यांची संख्या काही वर्षांपासून वाढत आहे. महिलांची वाढती संख्या लक्षात घेऊन खास महिलांसाठी गरबा-दांडिया कार्यशाळा सशुल्क किंवा मोफत घेण्यात येत आहे. काही संस्थाकडून महिलांसाठी खास गरबा कार्यक्रम घेतला जात आहे.
धावत्या जीवनशैलीत अनेकांना आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याने करमणूक आणि व्यायाम याचे समीकरण जुळवून आणण्यासाठी अनेकांची पाऊले ही कार्यशाळेकडे वळत आहेत. याविषयी प्रशिक्षक प्रज्ञा इखनकर यांनी माहिती दिली. महिला रोजच्या कामातून वेळ काढत कार्यशाळेत येतात. यामध्ये दांडिया, बॉलीवूड, पाश्चात्य, पारंपरिक अशा प्रकारे गरबा शिकवला जात आहे. यासाठी साधारणत: ६०० रुपयांपासून पुढे शुल्क आकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डी फोर अकॅडमीचे संजय सोनार यांनी उत्सवावर समाज माध्यमांचे गारूड असल्याचे मान्य केले. वेगवेगळ्या रिल्स, चित्रफिती पाहून आपणही असे करू शकतो, हा विश्वास लोकांमध्ये येत आहे.
मागील काही वर्षात तंदुरूस्तीसाठी आणि वाढत्या ताणावर उपाय म्हणून गरबा, दांडियाकडे पाहिले जात आहे. यामुळे चार वर्षापासून ६५ वर्षापर्यंत अनेकांनी यंदा कार्यशाळेत सहभाग घेतला. नाशिककरांचे खास गरबोलीसह दोडियो, रासलिला, दांडिया, पनघट, तीतोडा याशिवाय हिंदी चित्रपटातील वेगवेगळ्या उडत्या चालीच्या गाण्यावर एक ताली, दोन ताली, तीन ताली असे विविध प्रकार नृत्यप्रेमी शिकत आहेत. झुंबापेक्षाही अधिक व्यायाम गरब्यात होतो. संगीतही शरीर आणि मनासाठी उपयुक्त ठरत असल्याने अनेकांनी कार्यशाळेत सहभाग घेतल्याचे सोनार यांनी नमूद केले.
साई डान्स इन्स्टिट्यूटच्या पूजा आणि आरती गौड यांनी आपली भूमिका मांडली. बहुसंख्य महिला नेहमी घरकामात अडकलेल्या असतात. त्यामुळे वजन वाढण्यासह आरोग्यविषयक तक्रारी कायम सुरु असतात. शिवाय कामाचा ताण असतो. यावर पर्याय म्हणून गरबा, दांडियाकडे पाहिले जाते. घरातूनही पाठिंबा मिळत असल्याने महिलांचे प्रमाण वाढत आहे. काही आपल्या मुलांना घेऊन कार्यशाळेत सहभागी होत आहेत. यंदा नवरात्रोत्सवात वेगवेगळ्या ठिकाणी दांडिया-गरबा खेळतांना आपण वेगळे दिसावे, यासाठी खास दांडिया गॉगलची मागणी वाढली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेला झगमगाट डोळ्यांना त्रासदायक होऊ शकतो. तो त्रास टाळण्यासाठी या गॉगलची विचारणा होत आहे.
नाशिक शहरात नवरात्रोत्सवासाठी गरबा, दांडिया वेगवेळ्या पध्दतीने शिकविण्याच्या कार्यशाळा सुरु आहेत. या कार्यशाळांना युवावर्गासह ज्येष्ठांचाही प्रतिसाद मिळत आहे. गरबा, दांडियामुळे केवळ मनोरंजनच नव्हे तर, शरीराचा व्यायाम होत असल्याने आरोग्यासाठीही हे नृत्य उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.