जळगाव : छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा करणे काय वाईट आहे ? मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर ते तिसरे उपमुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी ‘नाशिकला वाली तुम्हीच, पालकमंत्री तुम्हीच’ अशा आशयाचे फलक झळकावले आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडूनही भुजबळ यांना पालकमंत्री करण्यासाठी फलकबाजी होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात येथे शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी भूमिका मांडली. कुणाला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री करायचे आणि कुणाला मंत्री करायचे, हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असणे काही चुकीचे नाही, चांगलेच आहे. पालकमंत्री मीच होणार, असे ते म्हणत असतील तर ते दावा करू शकतात. त्यांचे आमच्याकडून स्वागतच आहे, असेही महाजन यांनी नमूद केले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या नियोजित इंदूर-हैदराबाद महामार्गाच्या ठिकाणी वर्षभरापूर्वी आमदार एकनाथ खडसे यांनी जमिनी घेतल्याचा आरोप महाजन यांनी केला. खडसे यांनी जमीन कधी खरेदी केली, त्याचा पुरावा देतो. त्यांनी ती जमीन आता घेतलेली असल्याचा दावा महाजन यांनी केला. मंत्री गिरीश महाजन यांनी इंदूर-हैदराबाद महामार्गासाठी जमीन गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याच्या शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांनी हाणून पाडल्याचा आरोप होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. हे आंदोलन पोलीस कसे हाणून पाडतील, असा प्रश्न महाजन यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी शेतकऱ्यांची चर्चा झाली आहे. कशा पद्धतीने भूसंपादनाचा मोबदला असेल, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या संदर्भात आपण स्वतः शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांना जो भूसंपादन मोबदला द्यायचा आहे, त्या संदर्भात सरकारशी सध्या चर्चा सुरू आहे. होणाऱ्या महामार्गाच्या ठिकाणी वर्षभरापूर्वी आमदार एकनाथ खडसे यांनी जमिनी घेतल्या आहेत. आणि खडसे म्हणतात, की त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांनी ती जमीन कधी खरेदी केली, त्याचा पुरावा मी देतो. त्यांनी ती जमीन आता घेतलेली असल्याचा दावा मंत्री महाजन यांनी केला.