लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: दुचाकी घसरल्याने आईच्या कुशीतून निसटून रस्त्यावर पडलेल्या १० महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. जाखोरी फाटा परिसरात हा अपघात झाला. ज्ञानेश्वरी वारूंगसे असे मृत बालिकेचे नाव आहे. ज्ञानेश्वरीची आई गायत्री वारूंगसे (मूळ सोनारी, सिन्नर हल्ली मुक्काम शिंदे गाव) या आपल्या मुलीस सोबत घेऊन भाऊ शुभम बेरड याच्या दुचाकीवर चांदगिरी येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या.

सायंकाळी बहिण-भाऊ दुचाकीने परतीचा प्रवास करीत असतांना ही दुर्घटना घडली. चांदगिरी येथून शिंदे गावाच्या दिशेने दोघे येत असतांना जाखोरी फाटा येथील शंकर मंदिराजवळ वाहन आडवे गेल्याने शुभम यांनी अचानक ब्रेक लावले. त्यामुळे दुचाकी घसरुन गायत्री यांच्या कुशीत विसावलेली ज्ञानेश्वरी निसटली. ती रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… नाशिक: सिटीलिंकतर्फे विद्यार्थी बस पास केंद्र संख्येत वाढ

बहिण-भावाने तातडीने तिला बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.