लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी आपण ट्रेनचं तिकीट अगदी काही आठवडे आधी बुक करून ठेवतो. बऱ्याचदा ट्रेन चुकू नये, म्हणून नियोजित वेळेच्या अर्धा किंवा एक तास आधीच स्टेशनवर जाऊन थांबतो. तरीही ट्रेन लेट झाल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला आहे. पण मनमाड रेल्वे स्थानकावरच्या ४५ प्रवाशांना मात्र याच्या बरोबर उलट अनुभव आला! त्यांची ट्रेन स्थानकावर चक्क ९० मिनिटे अर्थात दीड तास आधी आली. पण याचं आश्चर्य वाटण्याऐवजी त्यांना मात्र धक्का व मनस्ताप सहन करावा लागला. कारण ही ट्रेन त्यांना न घेताच निघून गेली होती!

नेमकं काय घडलं?

दिल्लीला जाणारी वास्को-द-गामा – हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस तिच्या नियोजित वेळापत्रकानुसार मनमाड स्थानकावर सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी पोहोचणं अपेक्षित आहे. एकूण ४५ प्रवासी मनमाड स्थानकावर या ट्रेनमध्ये चढणार होते. त्यानुसार या सर्व प्रवाशांनी आपापल्या घरून निघण्याचं किंवा स्थानकावर ठरलेल्या वेळेत पोहोचण्याचं नियोजनही केलं. पण जेव्हा ते मनमाड स्थानकावर पोहोचले, तेव्हा ही ट्रेन चक्क नियोजित वेळेच्या दीड तास आधीच निघून गेल्याचा धक्का त्यांना बसला.

१०.३५ ऐवजी गोवा एक्स्प्रेस ९ वाजून ५ मिनिटांनी मनमाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर अवतरली! पुढच्या ५ मिनिटात निघूनही गेली. पण १०.३५ वाजेच्या नियोजनानुसार निघालेले ४५ प्रवासी तोपर्यंत स्थानकावर पोहोचलेही नव्हते. त्यामुळे त्यांना न घेताच गोवा एक्स्प्रेस निघून गेली.

प्रवाशांचा संताप!

हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर व्हायचं तेच झालं! या ४५ प्रवासांनी थेट स्टेशन मास्तरांचं कार्यालय गाठलं आणि आपला संताप त्यांच्यासमोर व्यक्त केला. आपल्याला आता प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करून द्या, अशी मागणी या प्रवाशांनी केली. यासंदर्भात पीटीआयशी बोलताना मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे म्हणाले, “या सर्व प्रवाशांना पुढच्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात आलं. गीतांजली एक्स्प्रेसचा मनमाडमध्ये थांबा नसूनही प्रवाशांसाठी ती या स्थानकावर थांबवण्यात आली होती. हे प्रवासी पुढे जळगावला उतरले. तिथे त्यांच्यासाठी गोवा एक्स्प्रेसला थांबवण्यात आलं होतं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चूक कुणाची?

दरम्यान, हा सगळा प्रकार घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून नेमकं काय घडलं याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. गोवा एक्स्प्रेसचा नियोजित मार्ग बेळगाव-मिरज-दौंडमार्गे मनमाड असा होता. मात्र, नेहमीचा मार्ग वळवून गोवा एक्स्प्रेस रोहा-कल्याण-नाशिकरोडमार्गे मनमाडला आली. त्यामुळेच ती दीड तास आधीच मनमाडला पोहोचली होती. “ही चूक रेल्वे कर्मचाऱ्यांकडून झाली आहे. यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे”, अशी माहितीही मानसपुरे यांनी दिली आहे.