जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारपासून सुरू असलेली सोने आणि चांदीच्या दरातील पडझड मंगळवारी सुद्धा कायम राहिली. अर्थात, दोन्ही धातुंचे दर अचानक कोसळल्याने ग्राहकांनी दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असताना, ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दागिन्यांच्या बाजारात सोन्या-चांदीच्या किमती अचानक कोसळल्या आहेत. गेल्या आठवड्यात दोन्ही धातुंच्या किमतींमध्ये मोठी वाढ दिसून आली होती.
शुक्रवारच्या बाजारानंतर बाजार तुलनेने स्थिर राहिला होता. परंतु, नवीन आठवड्याच्या सुरुवातीसह मंगळवारी देखील किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. यामुळे खरेदीदारांचा उत्साह वाढला आहे.सोने आणि चांदीच्या किमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा या किमतींवर परिणाम करत आहेत. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, चीन-जपान तणाव आणि अमेरिकन फेडच्या टिप्पण्यांमुळे बाजारावर परिणाम झाला आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत अंदाजे २.५ टक्क्यांची घसरण झाली होती, तर चांदीत ५.५ टक्क्यांची लक्षणीय घसरण झाली होती. कारण फेड अधिकाऱ्यांनी व्याजदर कपातीचे संकेत दिले नव्हते. एकूणच जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही घटकांमुळे सोने आणि चांदीच्या किमती दबावाखाली आहेत. आणि ही प्रवृत्ती नजीकच्या काळातही कायम राहू शकते. अमेरिकेतील टॅरिफ तणाव कमी झाल्यामुळे धोकादायक गुंतवणूक साधनांमध्ये रस वाढला आहे. जेव्हा बाजारातील अनिश्चितता कमी होते तेव्हा सोन्यासारख्या सुरक्षित-आश्रयस्थानांच्या मालमत्तेची मागणी कमी होते. यामुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील कमकुवतपणा आणखी वाढला आहे.
जळगावमध्येही सोमवारी २०६ रूपयांची किरकोळ नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २६ हजार ६९० रूपयांपर्यंत खाली आले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा प्रति १० ग्रॅम १४४२ रूपये आणि प्रति १०० ग्रॅम १४ हजार ४२० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २५ हजार २४८ रूपयांपर्यंत खाली आले. सोन्यात पाच दिवसांत प्रति १० ग्रॅम तब्बल ५३५६ रूपयांची घट झाल्याचे दिसून आले.
चांदीत ३०९० रूपयांनी घट
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी दिवसभरात २०६० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६२ हजार ७४० रूपयांपर्यंत खाली आले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा ३०९० रूपयांची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह एक लाख ५९ हजार ६५० रूपयांपर्यंत घसरले. चांदीत पाच दिवसांत प्रति किलो तब्बल १० हजार ३०० रूपयांची घट झाल्याचे दिसून आले.
