नाशिक – शहरातील रस्ते, इमारत, घराबाहेरील प्रांगणात, कधी दुचाकीवर मार्गक्रमण करताना घडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटना आता थेट घरात येऊन पोहोचल्याचे रामवाडी येथील घटनेवरून दिसत आहे. श्रद्धा पार्क इमारतीत चोरांनी महिलेच्या घरात शिरून ४० हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून नेली.

मागील काही वर्षात महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या घटनांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. या माध्यमातून चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील कोट्यवधींचे सोने लंपास केल्याचा अंदाज आहे. काही प्रकरणात चोरटे जेरबंद होतात. त्यांच्याविरुद्ध कारवाई होते. परंतु, सोनसाखळी चोरीच्या घटना अव्याहतपणे सुरू असल्याचे चित्र आहे. महत्वाचे म्हणजे, आजवरचा घटनाक्रम पाहिल्यास चोरट्यांची हिंमत वाढतच असल्याचे दिसते. रामवाडीतील घटना त्याचे ताजे उदाहरण. या बाबत नंदिनी नायक (६५, श्रद्धा पार्क, आदर्शनगर, रामवाडी) यांनी तक्रार दिली.

नायक खासगी रुग्णालयात नोकरीस आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कामकाज आवरून त्या घरी आल्या होत्या. इमारतीतील आपल्या सदनिकेत दळणाचा डबा आणि पिशवी ठेवत असतानाच पाठीमागून आलेल्या दोन संशयितांनी त्यांना भाडेकरूच्या पत्त्याविषयी विचारणा करुन पिण्यासाठी पाणी मागितले. नायक यांनी पाणी दिल्यानंतर रिकामा ग्लास परत देत असताना दोघांपैकी एकाने अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली.

नायक यांनी प्रतिकार करुन एकाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र, दुसऱ्याने त्यांच्या हातावर मारत त्याची सुटका केली. या घटनेत सोन्याच्या पोतीचा सुमारे ४० हजार रुपयांचा अर्धा भाग घेऊन चोरट्यांनी पलायन केले. हा संपूर्ण घटनाक्रम इमारतीतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारात उभे असणारे चोरटे सोनसाखळी खेचण्यासाठी थेट महिलेच्या घरात शिरल्याचे चित्रणात दिसत आहे. आजवर कमी वर्दळीच्या रस्त्यांवर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांकडून पादचारी महिलेच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याचे असंख्य प्रकार घडले आहेत. लग्न सोहळे वा तत्सम कार्यक्रमांसाठी महिलांना अंगावर दागिने परिधान करून जाणे धोकादायक ठरत आहे. कधीकधी एकाच दिवसात सोनसाखळी चोरीच्या तीन-चार घटना घडतात. कधी इमारत वा बंगल्याशेजारी महिलांचे दागिने खेचण्यात आले आहेत.

मध्यंतरी आगरटाकळी भागात दुचाकीवर जाणाऱ्या दाम्पत्याबाबत असाच प्रकार घडला होता. धावत्या वाहनावरील महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी खेचल्याने संबंधित महिला वाहनावरून पडून जखमी झाली होती. काही वर्षांपूर्वी गंगापूर रस्त्यावर अशाच घटनेत महिला दुचाकीवरून पडली होती. २०१८ मध्ये बँकेतून पैसे काढून घरी परतणारी महिला नासर्डी पूल परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांपासून पैशांची पिशवी वाचविताना दुचाकीवरून पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे नंतर त्यांचा मृत्यू झाला होता.

आकडेवारी काय सांगते ?

पोलीस यंत्रणेकडून उपलब्ध आकडेवारीनुसार २०२३ वर्षात नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या १२६ घटना घडल्या होत्या. त्यापुढील वर्षात म्हणजे २०२४ मध्ये ही संख्या १०६ वर आली. चालू वर्षात जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत सोनसाखळी चोरीच्या ६१ घटनांची नोंद झाली आहे.