जळगाव : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणावरून राज्य सरकारला विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनीही त्या वादात उडी घेतल्याने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता केला आहे. तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा गिरीश महाजन खूपच लहान होते, असा टोला खडसेंनी हाणला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीने अंदाजे १,८०० कोटी रुपयांच्या बाजार मूल्य असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारात केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आल्याचेही उघड झाले असून, मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घडामोडींची दखल घेत राज्य सरकारने तत्काळ चौकशी सुरू केली आहे.
प्राथमिक चौकशीत काही गंभीर बाबी आढळल्याने पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात पोलिसांनी केवळ दोन जणांविरोधात आतापर्यंत गुन्हा दाखल केले आहेत. पार्थ पवार हे अमेडिया कंपनीमध्ये भागीदार असतानाही त्यांना का वगळण्यात आले, असा प्रश्न आमदार खडसे यांनी केला आहे. कोरेगाव पार्कातील जमिनीची फाईल माझ्याकडेही आली होती, असेही खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. महसूल मंत्री असताना भोसरी जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी माझ्यासह कुटुंबावर बरेच आरोप झाले होते. वास्तविक जमीन खरेदी प्रकरणाशी माझा थेट संबंध नव्हता. तरीही मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचे नाव जमीन खरेदी प्रकरणात समोर आले असतानाही माझ्यावर त्यावेळी आरोप करणारे आता शांत बसले आहेत. सरकार आपल्या सहकाऱ्याच्या मुलाच्या कंपनीची चौकशी करणार आहे, हे जनतेच्या गळ्याखाली उतरणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात यावी. त्या माध्यमातूनच संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होऊन खरे सत्य बाहेर येईल, असे देखील खडसे यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर, मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना पुन्हा डिवचण्याची संधी शुक्रवारी जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना साधली. भोसरी जमीन खरेदी व्यवहारावरून आरोप झाल्यावर खडसेंनी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला की त्यांना तो द्यायला सांगितला होता, असा टोला महाजन यांनी हाणला. त्या विषयी बोलताना खडसे म्हणाले, की आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा गिरीश महाजन खूप लहान होते. भाजपकडून मला राजीनामा देण्याविषयी सूचना मिळताच मी त्यावेळी अर्ध्या तासांच्या आत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मला कोणी राजीनामा देण्यास भाग पाडले नव्हते. तसे नसते तर मला मंत्रिमंडळातून काढून टाकले असते. मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. वैयक्तिक मंत्री महाजन यांच्यावर बऱ्याच वेळा आरोप झाले, पण त्यांनी कधीच राजीनामा दिला नाही. महाजन यांनी जळगावमधील बीएचआर पतसंस्थेकडे तारण असलेल्या बऱ्याच मालमत्ता पुण्यात लिलावातून खरेदी केल्या आहेत. मात्र, कमी किंमतीत त्यांना त्या मालमत्ता कशा मिळाल्या, हा चौकशीचा भाग होऊ शकतो.
