धुळे – ठराविक रक्कम गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट मोबदला मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसविण्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आले आहेत.

आमिषाला बळी पडून अनेक जण आपली आयुष्यभराची पुंजी अशा वित्तीय संस्थेत, कंपनीत गुंतवणूक करतात. परंतु, त्यांना दुप्पट, ति्प्पट मोबदला तर सोडा, त्यांची गुंतवलेली रक्कमही परत मिळत नाही. असाच प्रकार ग्रो मोअर फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीसंदर्भात झाला आहे. या कंपनीचे संचालक आणि दलाल यांचेविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असून या कंपनीत गुंतवणूक करणार्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

पिंपळनेर येथील तक्रारदार आणि इतर शेतकर्यांना संशयितांनी ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा सात ते २५ टक्के पर्यंत व्याजाचा परतावा मिळेल किंवा गुंतवणुकीच्या दुप्पट-तिप्पट पैसे एका वर्षामध्ये मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला अनेक जण बळी पडले. कमी कालावधीत अधिक रक्कम मिळेल, या आशेने त्यांनी गुंतवणूक केली.

कंपनीकडून बँक खात्यावर आर.टी.जी.एस.द्वारे तसेच रोख स्वरुपात पैसे स्वीकारण्यात आले. त्यानंतर गुंतवणूकदारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परतावा देण्यात आला नाही. तसेच दिलेली मुद्दल रक्कमही परत करण्यात आली नाही. संशयितांनी संगनमताने फसवणूक करण्याच्या उद्देशाने कट रचून गुंतवणूकदारांचा विश्वासघात केला. आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक सविता गवांदे या करत आहेत.

ज्या गुंतवणूकदारांनी ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणूक केली असेल, अशा गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे या कार्यालयाशी ७०२०३१८५९५ किंवा ९९२३२८८००४ या नंबरवर संपर्क करावा. गुंतवणूकदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येत असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत: हून तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.