जळगाव : शासन जिल्ह्यातील अतिवृष्टीसह नदी-नाल्यांच्या पुरामुळे अतोनात नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनातर्फे नुकसानग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगरात गुरूवारी दिली.

जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील एक तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला. तसेच पाचोरा तालुक्यातील २०० जनावरे आणि ट्रॅक्टर वाहून गेले. जामनेर तालुक्यातील तीन जनावरे मृत्युमुखी पावली. नद्यांच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरले. केळी, कापसासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने ४४ गावांमधील ४३२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन ५४८५ शेतकरी बाधित झाले.

मुक्ताईनगर तालुक्यातही कुऱ्हा काकोडा, जुने बोरखेडा, राजूर, जोंधनखेडा, चिंचखेडा काही या गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीसह नदी-नाल्यांना पूर आल्याने कपाशी, मका ,सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी थेट शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

मुक्ताईनगर तालुक्यातील ज्या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे. आणि त्या संदर्भात अहवाल तत्काळ सादर करावा, अशा सूचना यावेळी मंत्री पाटील आणि सावकारे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या. कुऱ्हा गावातील गोरक्षगंगा नदीवरील पूल अतिवृष्टीनंतर खचून गेला आहे, त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

नाले खोलीकरण आणि संरक्षण भिंती उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच पाठविला आहे, अशी माहिती मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार गिरीश वखारे, शिवसेना उपजिल्हप्रमुख छोटू भोई, तालुका प्रमुख नवनीत पाटील, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ तसेच कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

मृताच्या वारसांना चार लाखांची मदत

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी किरण सावळे या तरूणाचा मंगळवारी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सावळे परिवाराची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत म्हणून किरण सावळे यांच्या पत्नीला चार लाख रूपयांचा धनादेश सुपूर्त केला.