जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपसह अजित पवार गटाने पक्षाचे मेळावे घेऊन यापूर्वीच अनेक दिग्गजांचे प्रवेश घडवून आणले आहेत. त्यानंतर आता शिवसेनाही (एकनाथ शिंदे) जोमाने तयारीला लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच काही माजी आमदार पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर वेगाने तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता पंचायत समित्यांचे सभापती आणि नगर परिषदांच्या नगराध्यक्षांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या वेळच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणाऱ्या महायुतीच्या भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट, तिन्ही घटक पक्षांकडून यंदा युतीचे संकेत दिले जात आहेत. प्रत्यक्षात, आपापल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश नेत्यांकडून गूपचूप दिले जात आहेत. विशेषतः भाजप त्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. मंत्री गिरीश महाजन यांनी समोरचा कसाही असला तरी त्याला भाजपमध्ये प्रवेश देण्याची भूमिका घेतली आहे.

अशा स्थितीत, भाजपच्या बरोबरीने नाही किमान निम्या जागा जिंकण्याची मनीषा बाळगून असलेल्या अजित पवार गटासह शिंदे गटाची चलबिचल अलिकडच्या काळात वाढली आहे. शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांनी तर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकसभेसह विधानसभेप्रमाणे युती कायम ठेवण्याचे थेट आवाहन केले आहे. युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भाजप नेते जाहीरपणे आमची युती असल्याचे सांगतात, पण पक्षाच्या मेळाव्यांत स्वबळाची भाषा करतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सध्या वेगवेगळे वारे वाहत आहेत. आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीत युती होते, तशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत का होत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० किंवा १२ तारखेला जळगावमध्ये आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी जिल्ह्यातील काही माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील तसेच माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे यांना अजित पवार गटाने यापूर्वीच पक्षात प्रवेश दिला आहे. याशिवाय, माजी आमदार दिलीप वाघ, अरूण पाटील आदींना भाजपने यापूर्वीच गळाला लावले आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रवेश करणारे ते माजी आमदार आहेत तरी कोण ?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी आमदारांची नावे मंत्री पाटील यांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत. शिंदे गट नेमके कोणत्या पक्षाला धक्का देते, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.