जळगाव: केळी पीकविम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील २७ महसूल मंडळांतील २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपनीतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२२-२३ साठी राज्य हिश्श्याची १९६ कोटींची रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देऊन निधी वितरित केला होता. यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पीकविमा नुकसानभरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा निर्धार आहे. तसेच जिल्ह्यातील खरीप हंगाम- २०२३-२४ पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला होता, अशा सुमारे २७ महसूल मंडळांतील शेतकरी हे पीकविमा निकषाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अधिसूचित करून भरपाईसाठी पात्र ठरविले होते. पात्र महसूल मंडळांतील विमाधारक शेतक-यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई देय असून, ती तत्काळ देण्याबाबत कार्यवाही करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, असे निर्देश दिले असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

हेही वाचा… अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी लाच; मालेगाव महापालिकेतील कर्मचारी अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्यासाठी सरसकट लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे संबंधित नुकसानभरपाई रक्कम ४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली आहे. याप्रसंगी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत तापी महामंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शेतकरी तक्रार निवारण व पीकविमा समितीचे हितेश आगीवाल व अधिकारी उपस्थित होते.