जळगाव – लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळताना अनेक लोक काम घेऊन येतात. पण आम्ही त्यांना कधीच नकार देत नाही. नुसतं हो म्हणायला काय लागतं, असे वक्तव्य शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे शनिवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखेने विविध विभागातील एकूण ३१३ उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेचे समन्वयन नियोजन समिती सभागृहात केले. मुंबई, पुणे, नाशिक आणि जळगाव येथील विभागीय कार्यालयांशी सतत समन्वय साधत सदर प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संबंधितांना नियुक्ती पत्रे वितरीत करण्यात आली. या प्रसंगी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करताना पालकंमंत्री पाटील यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत जोरदार फटकेबाजी केली. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे उपस्थित होते.

शासन आणि प्रशासन ही दोन चाके मानली जातात. काम होईल की नाही होईल माहिती नाही, पण आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करा. अर्धे काम तिथेच होऊन जाते. जळगावचे जिल्हाधिकारी नेहमी तेच करतात. कोणीही आला की त्याचे जोरात स्वागत केल्याने त्यांच्याकडे काम घेऊन आलेल्या व्यक्तीच्या लक्षातही राहत नाही की तो काय विषय घेऊन आला होता. ही एक आयडिया असते प्रत्येकाची. मला वाटते अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे काम घेऊन आलेल्या प्रत्येक नागरिकाचे समाधान करणे खरे कर्तव्य आहे. आमच्याकडे तर काही लोक असे काम घेऊन येतात की तुम्ही कल्पना करू शकत नाही. पण आम्ही कधीच नाही म्हणत नाही. हो म्हणायला काय लागतं, अशी मिश्किल टिप्पणी पालकमंत्री पाटील यांनी केली.

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे एक कर्मचारी आहे, त्याचे नाव मी सांगणार नाही. तो त्यांचा सर्वात खास प्रशासकीय अधिकारी आहे. कोणतेही क्लिष्ट प्रकरण आल्यावर त्याच्याकडे पाठवून दिले जाते. म्हणजे त्यांचे अर्धे काम संपते. हाताखालच्या कर्मचाऱ्यांना हाताळणे सुद्धा सोपे आहे, ते अधिकाऱ्यांना जमले पाहिजे. कायम तणावमुक्त राहा. नोकरीवाले आणि आम्ही पुढारी फार ताण घेतो. कशाला ताण घ्यायचा. जे तुमच्या प्रारब्धात आहे, त्याला कोणीच चुकवू शकत नाही. तुम्ही आता शासनाचे नोकर नाही तर जनतेचे सेवक आहात. त्यानुसार जनतेची सेवा करा, असा सल्ला मंत्री पाटील यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दिला. एखादा गरजू तुमच्यापर्यंत आला आणि त्याचे अश्रू तुम्ही पुसले तर त्यासारखे दुसरे समाधान नाही.आमचे दुकान त्याच्यावरच चालते. दिवसभरात २०-२५ गरजू लोकांची कामे केली की आमचा सगळा क्षीण निघून जातो, असेही त्यांनी नमूद केले.