नाशिक – नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायांविरूध्द मोहीम सुरू असून मालेगावसह धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा येथे छापा टाकून साडेसोळा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तीन विक्रेत्यांना अटक करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व पानटपऱ्या, गोदाम तपासणीचे काम ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे. याअंतर्गत एकाच दिवसात दोनशे पानटपऱ्या तपासून गुटख्याची विक्री करणाऱ्या तीन टपरी चालकांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला. मालेगाव तालुक्यातील पाटणे येथे तालुका पोलिसांना एका बंद घरात पत्र्याच्या शेडमध्ये एक लाख ३० हजार रुपयांचा गुटखा सापडला. याप्रकरणी मालेगाव येथील दादा मियाँ मन्सूरी याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुटखा धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा गावातून आणल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे पथकाने पुरमेपाडा येथे छापा टाकत १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच येवला शहरातून ग्रामीण भागात देशी, विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या जितेंद्र बोडके यास अटक करुन त्याच्याकडून ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तोंजवल फाटा येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरूध्द कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>>मालेगावात अमली पदार्थ निर्मूलनासाठी स्वतंत्र पथक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवैध प्रवासी वाहतुकीविरोधातही कारवाई

ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात पाहता ग्रामीण पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६० वाहन चालकांविरूध्द कारवाई करुन त्यांच्याकडून २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.